भाजप युवा मोर्चातर्फे 'सिंधुरत्न जाॅब फेअर' !

Edited by: भरत केसरकर
Published on: December 27, 2023 19:24 PM
views 252  views

सिंधुदुर्गनगरी : 'सिंधुरत्न जॉब फेअर' 2024 च्या आयोजनाने  सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील  बेरोजगार तरुणांना रोजगार संधी देण्यासाठी भाजप युवा मोर्चाने पुढाकार घेतला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सकाळी ९:३० वाजता हा भव्य रोजगार मेळावा होत आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे व गोवा येथील जवळपास 120 मोठ्या कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून निवड झालेल्या उमेदवारांना याच दिवशी नियुक्तीपत्रे व निवड न झालेल्या उमेदवारांना जॉब कार्ड दिले जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन यानिमित्ताने त्यादिवशी या जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतचे  माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी प्रभाकर सावंत विशाल परब, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रकाश मोरये, जॉब फेअर चे आयोजक युवा हब चे डायरेक्टर किरण राहणे, दीपक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत या सर्व नेत्यांना जॉब फेअर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे.  जिल्ह्यातील मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार या मेळाव्यासाठी दाखल होतील असे नियोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते उच्चशिक्षित बेरोजगारांना या मेळाव्यात जॉब देण्याचा प्रयत्न आहे.
     
टाटा, बिर्ला अशा मोठ्या कंपन्या, फाईव्ह स्टार हॉटेलचे व्यवस्थापक, व या भागातील अन्य मोठ्या कंपन्याही या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत, 120 कंपन्यांचे या फेरमध्ये शॉप राहणार असून उमेदवारांच्या मुलाखतीही याचवेळी होणार आहेत. पात्रतेनुसार  व त्यांच्याकडे असलेल्या कौशल्यानुसार त्या त्या कंपनीमार्फत निवड करून निवड झालेल्या उमेदवारांची त्याच ठिकाणी नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. मोठ्या संख्येने उमेदवार दाखल झाले तरी ज्यांची निवड होऊ शकत नाही, अशा उमेदवारांना जॉब कार्ड दिले जाणार असून  पुढील सहा महिने त्यांना या जॉब कार्डच्या माध्यमातून नोकरीची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबाबतची एक वेबसाईट व क्यू आर कोड उपलब्ध करून दिला जाणार असून  त्या आधारे जॉब फेअरच्या आधी उमेदवारांना ऑनलाइन माहिती या वेबसाईटवर अपलोड करता येणार आहे. गुणवत्ता व शिक्षणानुसार या सर्व कंपन्यांमध्ये असलेल्या पदांनुसार छाननी करून  प्रत्यक्ष जॉब फेअर दिवशी त्या-त्या उमेदवारांची त्या-त्या कंपनीकडे मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली जाईल वा त्याच ठिकाणी नियुक्तीपत्रे दिले जातील असे नियोजन करण्यात आले आहे. असेही प्रभाकर प्राप्त यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये रत्नागिरी सेंद्रिय जिल्ह्यातील युवक युवतीनी ऑनलाइन नोंदणी करावी व सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.