मालवणात २८ - २९ ला रोटरीच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 26, 2023 20:33 PM
views 98  views

मालवण : रोटरी परिवारच्या डिस्ट्रिक्ट ३१७० अंतर्गत रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२३ (सिंधुदुर्ग-रत्नागिरी) या क्रीडा स्पर्धा दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर होणार असून या स्पर्धेचे आयोजन रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब मालवणतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे दीडशे रोटरी सदस्य विविध खेळात सहभागी होतील, अशी माहिती रोटरी क्लब मालवणतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. 


मालवण येथील हॉटेल स्वामी येथे रोटरी क्लबची पत्रकार परिषद झाली. यावेळी मालवण रोटरी क्लबचे असिस्टंट गव्हर्नर संजय पुनाळेकर, रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष अभय कदम, इव्हेंट चेअरमन महादेव पाटकर, स्पोर्ट्स चेअरमन पंकज पेडणेकर, रोटरी सदस्य रमाकांत वाक्कर, राजेश पारधी, वेंगुर्ला रोटरी क्लब अध्यक्ष शंकर वजराटकर, सचिव योगेश नाईक, उपाध्यक्ष प्रथमेश नाईक आदी उपस्थित होते.


यावेळी अभय कदम व महादेव पाटकर यांनी या क्रीडा स्पर्धा आयोजना बाबत माहिती दिली. रोटरीच्या डिस्ट्रिक्ट ३१७० च्या या क्रीडा स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. यावर्षी या स्पर्धा मालवण रोटरी क्लबच्या आयोजनाखाली होणार आहेत. सिंधुदुर्ग व रत्नागिरी मधील रोटरीच्या १७ क्लब मध्ये या स्पर्धा होतात. यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, १०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक अशा विविध खेळांचा समावेश आहे. या स्पर्धेत सुमारे १५० रोटरीयन सहभागी होणार आहेत. यातील प्रत्येक खेळ प्रकारातील २ विजेत्यांची वेंगुर्ले येथे होणाऱ्या पुढील फेरीसाठी निवड होणार आहे.


या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे पास्ट डीजी संग्राम पाटील, आयपीएल मध्ये खेळलेला बडोदा येथील क्रिकेटपटू धीरेन साळवी, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स सेक्रेटरी संजय साळोखे तसेच बक्षीस वितरण समारंभास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे डीजी नासिर बोरसाडवाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.