शनिवारच्या शाळेच्या बदललेल्या वेळेला विरोध..!

Edited by:
Published on: August 28, 2024 14:04 PM
views 123  views

दोडामार्ग :  शनिवारच्या शाळेची बदललेल्या वेळेला आडाळी प्राथमिक शाळा नं 1 च्या पालकांनी विरोध दर्शविला आहें. त्याविरोधात गेल्या सात शनिवार पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही. शिक्षण विभागाकडूनं शाळेची नवी वेळ स्वीकारण्याची विनंती पालकांना करण्यात आली, मात्र जुन्या वेळेला आमचा विरोध नसताना नवीन वेळ आम्ही स्वीकारायचीच कां? असा प्रश्न पालकांच्या वतीने सरपंच पराग गांवकर यांनी केला आहें. त्यामुळे जोपर्यंत शाळेची वेळ पूर्ववत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे श्री. गांवकर यांनी स्पष्ट केले. 

शहरी व विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा सकाळच्या सत्रात भरतात त्यामुळे मुलांची झोप पुर्ण नं झाल्याने विद्यार्थ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडते, यां तर्कच्या आधारावर शिक्षण विभागाने सकाळच्या सत्रातील शाळा सकाळी 9 नंतर भरवा असा आदेश काढला. हा आदेश जिल्हा परिषदच्या प्राथमिकच्या शाळाना लागू करुन शनिवारच्या शाळेची वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 अशी केली. मात्र ही वेळ निश्चित करताना पालकांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे आडाळी शाळा नं 1 च्या पालकांनी यां वेळेला विरोध करतं जुन्या वेळेप्रमाणे शाळा भरविण्याचा निर्णय घेतला. मात्र शासन आदेशाच्या विरोधात जात जुन्या वेळेप्रमाणे शाळेत येण्यास शिक्षकांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे अखेर पालकांनी वेळ पूर्ववत होईपर्यंत शनिवारी शाळेत मुलांना नं पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले तब्बल सात शनिवारी शाळेत मुलं आली नाहीत. 

याबाबत सरपंच श्री. गांवकर म्हणाले की ' आवश्यकता नसताना आणि पालकांची मागणी नसताना शाळेची वेळ बदलण्यात आली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रश्नाचे उत्तर शोधताना शासन  ग्रामीण भागातील मराठी शाळांना सरसकट गृहीत धरते, हेच मुळात दुर्दैवी आहें. शनिवारची सकाळची शाळा यांला विद्यार्थी जीवनात विशेष स्थान आहें. पिढ्यानंपिढ्या प्राथमिक शाळेतला शनिवार हा आनंददाई आहें. मात्र मनाला वाट्टेल तसे अतर्किक निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभागाला याचं भान राहू नये याचं आश्चर्य वाटते. कोरोनाच्या काळात शाळा व्यवस्थापन समित्याना अधिकार दिले. त्यावेळी बहुतांश जबाबदरी त्यांनी पार पाडली. आज शनिवारी शाळेशी संबंधित एकही सरकारी कार्यालय सुरु नसते, मग केवळ शनिवारी भरणाऱ्या शाळेबाबतच हा अट्टाहास कां? उन्हाळ्यात सकाळछा सत्रात 9 ते 1 अशी शाळा भरविणे शक्य आहें कां? उन्हाच्या तडाख्याने आमच्या मुलांचे आरोग्य बिघडणार नाही कां? यां प्रश्नाचा विचार प्रशासनाने करावा. आम्ही आमच्या मुलांना जाणीवपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला आहें. त्यामुळे आमच्या देखील भावनांचा प्रशासनाने विचार करावा अन्यथा नाईलाजाने आम्हाला अन्य पर्याय निवडावा लागेल. शनिवारच्या शाळेच्या वेळेबाबत गट व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर ' तुम्ही शाळा सुरु ठेऊन पाठपुरावा करत रहा, अशीच विनंती करत राहिले आहेत. प्रशासनाने शासनपर्यत जनभावना पोहचवून वेळे बाबत निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीला द्यावेत.