
सावंतवाडी : सिंधुदुर्गतील ही सभा ११ जिल्हे बघतील तेव्हा निश्चित त्यांना पाठबळ मिळेल. तुमचा विकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणा विरोधात असेल तर तो आम्हाला मान्य नाही. कष्टकरी लोकांच्या हिताचा विकास असेल तर विनामोबदला जमीनी लोक देतील असं मत शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी व्यक्त केले.
राज्य आणि केंद्र सरकारला आधीच कर्ज आहे. आपल्यावर हे सरकार कर्ज लादत आहे. हा विषय फक्त जमीनी जाणाऱ्यांचा नाही. याचे परिणाम सर्वांना सहन करावे लागणार आहेत. पॉलिटिकल टूरीझमला संधी देऊ नका अस आवाहन त्यांनी केलं. २२ वर्ष तुम्हाला मुंबई-गोवा महामार्ग करता आला नाही. त्यामुळे शक्तीपीठ कसा आहे याचाही विचार करावा. शक्तीपीठबाबत सरकार चर्चा करायला तयार नाही. देवेंद्र फडणवीस काही गोष्टी लपवत आहेत. कोकणच्या दृष्टीने शक्तीपीठ मार्ग हे संकट आहे. इथले जंगली प्राणी नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाणार नाही. ते आपल्याच घरादारात येणार आहेत. त्यामुळे आजच विचार केला पाहिजे. जंगल उद्ध्वस्त होऊ देता नये असही ते म्हणाले.
दरम्यान, आम्ही विकास विरोधी नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्ग होताना आम्ही कधी विरोध केला का ? त्यामुळे आता आणखीन पर्यायी शक्तीपीठ हवा तरी कशाला ? असा सवाल त्यांनी केला. तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून किती प्रवासी येतात हे देखील बघितले पाहिजे. शक्तीपीठ का हवा ? याच कारण अद्याप सरकार देऊ शकले नाहीत. सरकार चर्चा करायला तयार नाही असे विधान केले. तसेच अजूनही या साठीचा मोबदला जाहीर केलेला नाही. चांगला मोबदला देऊ असं सरकार म्हणत आहे. सह्याद्री पट्टयातून हा महामार्ग खनिज संपत्ती वाहून नेण्यासाठी आहे अस विधान त्यांनी केले.