अदानी समुहाच्या स्मार्ट मीटरला विरोध

वीज ग्राहक संघर्ष समिती देणार अधीक्षक अभियंताच्या कार्यालयावर धडक मोर्चा
Edited by: विनायक गांवस
Published on: February 06, 2025 16:49 PM
views 269  views

सावंतवाडी : वीज ग्राहकांना डोकेदुखी ठरणाऱ्या अदानी समुहाच्या स्मार्ट मीटरच्या विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून सोमवारी 10 फेब्रुवारीला कुडाळ येथील अधीक्षक अभियंताच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती संघर्ष समितीचे प्रमुख संपत देसाई यांनी दिली. कोल्हापूरमध्ये याला विरोध करण्यात आल्यानंतर स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही अशी भूमिका तेथील महावितरणने घेतली. तशीच भूमिका सिंधुदुर्गात घेण्यात यावी अशी प्रमुख मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाकरे गट, काँग्रेस आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ कॉम्रेड नेते संपत देसाई, उबाठा  शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, माजी सभापती मंगेश तळवणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, या ठिकाणी अदानी समूहाला हाताशी धरून  शासनाकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्याचे प्रकार सुरू आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला सहन करावा लागणार आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेली यंत्रणा व पायाभूत सुविधा ठेकेदाराच्या गळ्यात घालण्याचे पाप शासनाकडून केले जात आहे. मुख्य म्हणजे स्मार्ट मीटर झाल्यानंतर ही ऑनलाइन प्रक्रिया अहमदाबाद येथून नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा फटका लोकांना सहन करावा लागणार आहे. या प्रस्तावाला येथील जनतेने तीव्र विरोध करावा त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या धडक मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.


मायकल डिसोझा म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज ग्राहकांना लुटण्याचे हे काम आहे. वस्तूस्थिती लक्षात घेता  सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज चोरी, वीजगळती आणि थकीत बिलांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्मार्ट मीटरची गरज नाही. तसेच माजी सभापती मंगेश तळवणेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता ही शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यामुळे प्रथम पैसे भरणे यांना शक्य होणार नाही. जुनीच पद्धत अवलंबण्यात यावी. शासनाने घेतलेला हा निर्णय  अन्याय करणारा आहे. या निर्णयाच्या विरोधातील मोर्चाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.