शक्तीपीठ महामार्गाला सावंतवाडीतील शेतकऱ्यांचा विरोध !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2024 13:38 PM
views 235  views

आंबोली | काका भिसे :  गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या.

ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खासगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते. लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.