
कणकवली : कणकवली शहरांमध्ये जुना भाजी मार्केट येथे व्यापाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे काम सुरू आहे. यावेळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी धडक देत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते तथा नगरसेवक सुशांत नाईक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना देखील तात्काळ बोलवत परिस्थितीची माहिती दिली. यावेळी महिला नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडल्या आणि लवकरात लवकर पर्यायी स्वच्छतागृह उभारा असे सांगितले. नाईक यांनी देखील आठ दिवसात पर्यायी स्वच्छतागृह उभारा असे सांगितले.
जुने भाजीमार्केट येथे असलेले न.पं.च्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरु आहे. हे काम करत असताना पर्यायी स्वच्छतागृहाची व्यवस्था न केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते तथा नगरसेवक सुशांत नाईक यांनी पटवर्धन चौकनजीक असलेल्या जुन्या भाजी मार्केट असलेला न.पं.च्या स्वच्छतागृहातील शौचालय व बाथरुमचे तोडकाम सुरु आहे, त्या ठिकाणी जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर हे देखील उपस्थित होते. यावेळी सर्व व्यापारी वर्ग व कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. हे बांधकाम सुरु करण्यापूर्वी फिरते स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे गरजेचे असताना देखील ती न.पं. प्रशासनाकडून केली गेली नसल्यामुळे विक्रेते, फिरते व्यापारी व नागरिकांची स्वच्छतागृहाअभावी कुंचबना होत आहे. नवीन स्वच्छतागृह उभारणीसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार असून या कालावधीत कणकवलीतील व्यापारी आणि नागरिक यांनी जायचे कुठे? याचा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नाईक यांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे केली आहे.