
सावंतवाडी : मोती तलावात येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वनविभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आले आहे. जलद कृती दलाच्या या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली असून तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने प्रयत्न केले होते. मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सावंतवाडीच्या मोती तलावात मगर असल्यामुळे भितीच वातावरण होत. त्यात ती संगीत कारंजावर येऊन दर्शन देत होती. यामुळे ऐन गणेशोत्सवात विसर्जनस्थळी संकट निर्माण झाल होत. त्यामुळे या मगरीला पकडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र, त्यात यश येत नव्हते. तब्बल दोन वेळा तिनं संगीत कारंजावर दर्शन देखील दिल. मात्र, आज लावलेल्या सापळ्यात जलद कृती दलाच्या मोहिमेला यश आले. यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल प्रमोद राणे, पथक प्रमुख बबन रेडकर, प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब, राकेश अमृसकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वनक्षेत्रपाल सुहास पाटील म्हणाले, नागरिकांत विसर्जनवेळी भितीच वातावरण होत. त्यामुळे या मगरीला पकडण्यात याव अशी मागणी केली होती. यानुसार आज तिला पकडण्यात आले असून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. साधारण ५ फुटाची ही मगर होती. तसेच ही ३६४ वी मगर आम्ही रेस्क्यू केली आहे. पाणी जास्त असल्याने आम्हाला विलंब झाला, मोठं आव्हान समोर होत. मात्र, आज लावलेल्या सापळ्यात ती अडकली अशी माहिती जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांनी दिली. यावेळी नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.