शिक्षकांच्या समस्या फक्त आम्हीच सोडवू!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

वेंगुर्ले येथे प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 16, 2023 16:52 PM
views 562  views

वेंगुर्ले : आपल्या सर्वांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अढळ आहे. कारण भावी पिढीला आकार देऊन त्यांना विधायक दिशा देण्याचे महान कार्य शिक्षक बांधव करतात, याचा मला सार्थ अभिमान असून राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून आम्हीच शिक्षकांच्या समस्या सोडवू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली.

वेंगुर्ला येथील कॅम्प मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन गुरुवारी संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस सचिव विजय कोंबे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, सरचिटणीस सचिन मदने यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री  उदय सामंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे स्वागत केले. तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, वेंगुर्ला येथे दोन दिवसात शैक्षणिक विचारांचे मंथन झाले त्याबद्दल शिक्षक समितीचे आपण कौतुक करतो. आज मला माझ्या शिक्षकांची आवर्जून आठवण येते. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला, त्याला कारण फक्त माझे शिक्षक हेच आहेत. शिक्षकांची जागा कोणालाही घेता येणार नाही, राज्यातील सर्व मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लवकरच अंमलात येईल. राज्याला पुढे नेण्याचे काम शिक्षण विभाग करतो आहे. याचे श्रेय जेवढे शिक्षकांना आहे, तेवढेच ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही जाते, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकरांवर उधळली स्तुतिस्तुमने-

आपले मनोगत व्यक्त करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जेव्हा आम्ही 'त्या' ठिकाणी गेलो, तेव्हा मी प्रचंड तणावात होतो. मला काय करावे, मीडियाला कसे सामोरे जावे? हेच सुचेना, अशावेळी मला दीपक केसरकर यांनी मोलाची साथ दिली.  सुदैवाने तेच आता शिक्षण मंत्री असल्यामुळे तुम्हालाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. केसरकर यांच्या अंगी असलेल्या अभ्यासू, शांत, संयमी स्वभावाचा जसा शासनाला फायदा होत आहे, तसाच राज्यातील शिक्षक बांधवांना देखील निश्चित फायदा होईल, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री केसरकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

देशात शैक्षणिक गुणवत्तेत राज्य अव्वल-

महाराष्ट्र राज्याची शैक्षणिक गुणवत्ता अतिशय चांगली असून राष्ट्रीय शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनात १००० गुणांपैकी ९२८ गुण मिळवत महाराष्ट्र शैक्षणिक गुणवत्तेत अव्वल स्थानी आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


शिक्षकांची पदे लवकर भरणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

 आमचे सरकार हे सामान्य जनतेचे सरकार आहे, म्हणून प्राथमिक समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत. राज्यात रिक्त असलेल्या तीस हजार शिक्षकांची पदे लवकर भरली जाणार, यासाठी सोप्या पद्धतीने शिक्षक भरतीचे आयोजन करण्यात येणार, केंद्रप्रमुख व इतर शैक्षणिक पदांवरही लवकरच भरती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिक्षकांच्या समस्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच सोडवू शकतात. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे लाडके मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब यांचा अल्पावधीत लौकिक वाढला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत. त्यामुळे प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्यामुळे साहजिकच शिक्षक बांधवांनाही ते न्याय देतील, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.


डॉक्टरांना Dr. तसे  शिक्षकांनाही मिळणार Tr. -

राज्यात शालेय शिक्षण विभाग अतिशय चांगले काम करत आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर लोकांना संक्षिप्त रूप म्हणून Dr. असे नावापुढे लावण्याचा अधिकार आहे. तसेच यापुढे राज्यातील शिक्षकांनाही Tr. असे संक्षिप्त रूप लावण्याबाबत लवकरच शासन निर्णय घेणार असून हा निर्णय शिक्षकांच्या हितासाठी घेत असल्याचे शिक्षण मंत्री केसरकर यांनी सांगितले. Tr. शिक्षकांनी आपल्या वाहनावर लावल्यामुळे त्यांना कोणीही अडवणार नाही.  लवकर आणि वेळेवर शाळेत त्यांना पोहोचता येईल, या सारख्या अनेक गोष्टी ध्यानात घेऊन आपण हा निर्णय घेणार असल्याचेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. 



वेंगुर्ला येथे लोटला  जनसागर-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनासाठी 'चांदा ते बांदा' या पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य असलेले शिक्षक हजारोंच्या संख्येने वेंगुर्ला येथे दाखल झाले होते. अनेक शिक्षकांनी आपल्या डोक्यावर गांधी टोपी परिधान करून त्यावर 'एकच मिशन जुनी पेन्शन' असे लिहिले होते. हजारोंच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करीत या महाअधिवेशनातून प्राथमिक शिक्षक समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अनेक  नेत्यांचे लक्ष वेधले असल्याचे पहावयास मिळाले.

महाअधिवेशनाचे प्रास्ताविक राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकेतून शिंदे यांनी मुख्यमंत्री शिंदे व शिक्षण मंत्री केसरकर यांच्याकडे प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांचा पाढाच वाचला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस सचिन मदने यांनी केले.


'एकच मिशन जुनी पेन्शन' ने दणाणला परिसर -

१७ व्या त्रैवार्षिक  राज्य महाअधिवेशनासाठी राज्यभरातून प्राथमिक शिक्षकांचा जनसागर वेंगुर्ले येथे दाखल झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुरू असताना प्राथमिक शिक्षकांनी 'एकच मिशन जुनी पेन्शन' असा नारा देत मुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनीही "माझ्याकडे तुमच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात पोहोचल्या आहेत. तेव्हा तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या सर्व सोडविण्यासाठी आमचे सरकार हे कटिबद्ध आहे", असे सांगितले. त्यानंतर घोषणा देणारे प्राथमिक शिक्षक शांत झाले व सभा अत्यंत शिस्तबद्ध स्वरूपात पार पडली.


उदय शिंदे राज्यशिक्षक नेते तर विजय कोंबे नवे राज्याध्यक्ष

 या महाधिवेशनात  सद्याचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांची राज्यशिक्षक नेते पदी सरचिटणीस विजय कोंबे यांची नवे राज्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राज्य महासचिव पदी राजन कोरगावकर यांची निवड करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.