पारंपारिक मासेमारीच भविष्यात मच्छीमारांना वाचवेल : जो किझाकुडण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 18, 2023 12:22 PM
views 52  views

देवगड : पारंपारिक मासेमारी आत्मसात करून त्याचे कौशल्य कायम मच्छीमारांनी जपून ठेवने गरजेचे आहे. पारंपरिक मासेमारी टिकली तरच मत्स्यसंपदा टिकून राहणार आहे.यामुळे पारंपरिक मच्छीमारांना सहकार्य करण्याची सरकारची तयारी आहे. मासळी जगली तरच मासेमारी व्यवसाय आणि पर्यायाने मच्छीमार जगणार आहेत.हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच यावर मासेमारी बंदी नव्हे तर माशांना सुरक्षित अधिवास हाच उपाय आहे.असे सीएमएफआरआय तामिळनाडूचे प्रधान शास्त्रज्ञ जो किझाकुडण म्हणाले.

देवगड येथील देवदुर्ग मत्स्य सहकारी संस्था मया. देवगड मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र शासन आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने समुद्रात कृत्रिम भित्तिका उभारणीसाठी मच्छीमारांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वैज्ञानिक CMFRI डॉ जो किझाकुडण, सहाय्यक वैभव म्हात्रे, एएफडीओ रवींद्र मालवणकर, जेष्ठ व्यवसायिक नंदकुमार घाटे, देवदुर्ग सोसायटी उपाध्यक्ष श्रीपाद पारकर,पोलीस अधिकारी निळकंठ बगळे, युएनडीपी विभागाचे अधिकारी रोहित सावंत, दिर्बा गणेशचे जगन्नाथ कोयंडे, गिर्ये बांदेवाडी सोसायटीचे संदीप डोळकर, वनविभागाचे साठे साहेब,कांदळवन विभागाचे लक्ष्मण तारी, तारामुंबरी सोसायटीचे तोरस्कर व सर्व सागर मित्र,सुरक्षा रक्षक,सर्व मामच्छिमार,नौका मालक,खलाशी व तांडेल उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना शास्त्रज्ञ जो किझाकुडण म्हणाले की, समुदातील कृत्रिम भित्तिका है मत्स्यसंपदा एकत्रित करण्याचे एक शास्त्रोक्त अभ्यास करून निर्माण केलेले साधन आहे.

हे साधन समुद्राच्या तळावरील आढळणारी वनस्पती व मासळीची उपलब्धता विकसित करण्यासाठी, तसेच मत्स्यसाठ्यांना एकत्रित करण्यासाठी आणि मासळीची पैदास करून त्यांना घरासारखे सान्निध्य निर्माण करून देतात. मत्स्य साठे वाढविण्यासाठी आपल्याकडे कोणते उपाय आहेत, हे आपण सांगू शकता काय? जेवढे मासे आपण खाल्ले तेवढे मासे तरी प्रत्येकाने जगविले तरच मत्स्य संपदेत वाढ होऊ शकते. समुद्र म्हणजे कचरा टाकण्याची जागा नाही. समुद्राला जपले पाहिजे. समुद्र आपला पोशिंदा आहे ही भावना जागृत ठेवली पाहिजे. मत्स्य साठे कमी होत चालले आहेत, हा प्रश्न मासेमारी बंदी करून सुटणार नाही. तर माशांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करायचा आहे. जेणेकरून मासेमारी शाश्वत होणार असल्याचे शास्त्रज्ञ जो किझाकुडण हे म्हणाले.