संतांचे विचारच समाजाला दिशा देऊ शकतात : बबन राणे

Edited by:
Published on: April 28, 2025 15:20 PM
views 29  views

सावंतवाडी : महाराष्ट्राला संत परंपरेचा समृद्ध वारसा लाभला असुन संतांचे विचारच समाजाला दिशा देऊ शकतात. त्यामुळे समाजही संत परंपरेचा आदर करतात. ही संत परंपरा पुढे सुरू ठेवण्याचे कार्य प. पू. सद्गुरु आबा महाराज यांनी केले. त्यामुळे समाज घडवण्यात प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांनी केले. इन्सुली बिलेवाडी येथील प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात बबन राणे  बोलत होते. यावेळी व्यासपिठावर माजी उपसरपंच कृष्णा सावंत, बापू कोठावळे, सुरेश शिंदे, निळकंठ कोठावळे, ओटवणे येथील प्रसिद्ध दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, शशी सावंत, रवींद्र कोठावळे, जयराम ठाकूर, तुशार कोठावळे, सुशिल सावंत, संकेत म्हापणकर आदी उपस्थित होते.

यानिमित्त सद्गुरू आबा महाराज स्मृती मंदिरात पादुका पूजन व अभिषेक, सत्यनारायण महापूजा, आरती, महाप्रसाद, स्थानिक भजने, गणेश हिर्लेकर लिखित श्री सातेरी शांतादुर्गा नाट्य मंडळ (परमे) यांचे 'रक्ताचा टिळा' हे सामाजिक नाटक आदी भरगच्च कार्यक्रम झाले. या दिवशी प. पू. सद्गुरु आबा महाराज यांचे हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेत त्यांचा कृपार्शिवाद घेतला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सलमान करण्यात आला. प. पू. सद्गुरु आबा महाराज यांच्या २७ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे नियोजन इन्सुली बिलेवाडी येथील सद्गुरु कला व नाट्य भजन मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू कोठावळे यांनी, सुत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष सचिन कोठावळे तर आभार तुषार कोठावळे यानी मानले.