देवगड खून प्रकरणी मालवण मधील एकास अटक

२५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
Edited by: नागेश दुखंडे
Published on: September 19, 2023 20:54 PM
views 3100  views

देवगड : मिठबाव येथील प्रसाद परशुराम लोके या युवकाच्या मुणगे मसवी येथील खून प्रकरणी या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.अवघ्या १२ तासात ओरोसच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.संशयित अरोपि किशोर पवार ला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता  त्याला 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

याबाबतची माहिती अशी – सोमवारी सकाळी मिठबाव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके (वय – ३१ वर्षे याचा मुणगे मसवी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाजवळ वाहन क्रमांक एम. एच- ०७ ७५६९ ही मोटार आढळून आली. या गाडीची तोडफोड केल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक शेळके व स्थानिक गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा संपुर्ण अभ्यास करण्यात आला. फॉरेन्सीक टिम व डॉगस्कॉड यांना पाचारण करुन आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी घटनास्थळास पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व उप विभागीय पोलीस अधिकारी, कणकवली के. एल. सावंत यांनी भेट देऊन तपासास मार्गदर्शन केले. या गुन्ह्याची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात आली. प्रसाद लोके याने मिठबाव ते मुणगे मसवी या रत्याने प्रवास केलेला प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने या रस्त्यावर असलेल्या शासकीय तसेच खासगी कॅमेऱ्याची सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. परंतु त्यामध्ये कोणतेही संशयास्पद वाहन मयताच्या वाहनाच्या पुढे किंवा पाठी येता जाताना दिसले नाही. प्रसाद याचा मोबाईल घटनास्थळावर मिळून आला नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने प्रसादच्या मोबाईल फोन क्रमांकांचे विश्लेषण केले. त्याचबरोबर त्याचे नातेवाईकांकडे तसेच मित्रमंडळीकडे चौकशी केली असता प्रसाद हा मिठबांव येथे महा ई सेवा केंद्र तसेच भाड्याने वाहन पुरविण्याचे काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. रविवारी प्रसाद याला भाडे तत्वावर वाहन पाहीजे असल्याचा फोन आल्याचे त्यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. त्यामुळे तो मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास घरामधुन निघुन गेला होता. प्राप्त गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हा गुन्हा किशोर परशुराम पवार, रा. कुंभारमाठ, ता. मालवण याने केल्याचे निदर्शनास आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपीचा कोणताही मागमूस नसताना तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हा घडल्यापासुन १२ तासाच्या आत आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यात आला आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी के. एल. सावंत, यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहायक पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलीस नाईक आशिष जामदार, पोलीस कॉन्स्टेबल यश आरमारकर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुदंळेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे व ओ. टी. बी. पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल रवि इंगळे यांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे.