
सावंतवाडी : गणेशचतुर्थीत दीड, पाच, सात, नऊ, अकरा ते एकवीस दिवसांचा गणपती बसवला जातो हे आपल्याला माहीत आहे. मात्र, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्यात दीड दिवस नागोबाचे पूजन करण्याची अनोखी परंपरा आहे. नागपंचमी साजरी करण्याची ही अनोखी परंपरा आजही सुरू आहे.
कोकणात एकदिवसीय होणारा हा उत्सव असतो. मळगाव- रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात दोनशेहून अधिक वर्षे हा उत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे दीड दिवसांचा हा नागोबा चक्क पाच फणांचा असतो. मळगाव-रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच फण्याची प्रतिमापूजन करून नागपंचमी साजरी करण्यात येते. वडिलोपार्जित चालत आलेली ही परंपरा कै. शांताराम बंडू गोसावी व कै. रामचंद्र बंडू गोसावी यांच्यानंतर त्यांचे मुलगे धर्मनाथ शांताराम गोसावी, संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी व त्यांचे कुटुंबीय जतन करत आहेत. नागपंचमीच्या पूर्वसंध्येला ब्राम्हण भोजन व एकादशमी, कुलदेवतेची पूजा करण्यात येते.