
कणकवली : कणकवलीत एलसीबी विभागाने चोरट्या दारू वाहतुकीवर आज पुन्हा धडक कारवाई केली. या कारवाईत सुमारे 58 लाखाच्या दारूसह 69 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई गोवा महामार्गावर वारगाव येथे मध्यरात्री एक वाजता ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे बिनधास्तपणे ही चोरट्या दारूची वाहतूक केली जात होती.
गोव्यातून राज्यात येणाऱ्या दारू वाहतुकीवर नियंत्रण येण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग एलसीबी विभाग सातत्याने दारू वाहतुकीवर छापे टाकून प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न करत आहे. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली जात आहे. त्याच पद्धतीने वारगाव येथे पीएसआय आर.बी.शेळके, हेडकॉन्स्टेबल राजू जामसंडेकर यांना दारूची चोरटी वाहतूक एका ट्रक मधून होत असल्याचे कळल्यानंतर या दोघांनी वारगाव येथे आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला आणि 69 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.










