
कणकवली : कणकवली शहरातील नगरपंचायत चे क्रीडांगण आरक्षण क्रमांक 56 चे भूसंपादन करण्याकरिता जमिनीची मोजणी भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू असताना सदर आरक्षणाच्या ठिकाणी जमीन मालक उमेश वाळके व त्यांचा मुलगा सोहम वाळके यांनी आम्हाला जमीन मोजणी मान्य नाही. तुम्ही टेबल लावला तर टेबल फेकून देईन व आम्ही सोबत मसाला आणला आहे तो डोळ्यात फेकू असे सांगत सदर जमीन मोजणी करिता टेबल लावु दिले नाही. यावेळी मोजणी अधिकारी रोशनी मठकर यांनी तुमच्या काही तक्रारी असतील तर त्या लेखी द्या असे सांगितले. तरीदेखील मोजणीस विरोध करत अडथळा आणल्याने उमेश वाळके व त्यांचा मुलगा सोहम वाळके यांनी या जमीन मोजणीस विरोध करत शासकीय कामात अडथळा आणला व मोजणी करण्यासाठी अटकाव केल्या प्रकरणी नगरपंचायतचे लिपिक मनोज धुमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश वाळके व सोहम वाळके यांच्या विरोधात भा द वि कलम 353, 168, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्री. धुमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरक्षण क्रमांक 56 या ठिकाणी भूसंपादन करण्या करिता संयुक्त मोजणीसाठी आज 16 जानेवारी रोजी सकाळी निमतनदार आर एन मठकर यांना नेमण्यात आले होते. सदर जागा ही मुडेडोंगरी येथे आहे. कणकवली नगरपंचायत ची प्रतिनिधी म्हणून श्री. धुमाळे हे उपस्थित होते. 1999 च्या डीपी प्लान नुसार सदर 56 क्रमांक चे आरक्षण ही क्रीडांगणा करिता आरक्षित आहे. मात्र ही जागा जमीन मालकांच्या मालकीची आहे. दरम्यान आज सकाळी नियोजित वेळेनुसार श्री. धुमाळे व नगरपंचायत चे अभियंता अनंत कुबल मोजणीच्या ठिकाणी मुडेडोंगरी या ठिकाणी हजर होते. तसेच वन विभाग, कृषी विभाग व निमतनदार व अन्य जमीन मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. 10.30 वाजण्याच्या सुमारास भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी प्रक्रिया सुरू करण्यात येत असताना, निमतनदार श्रीमती मठकर यांना उपस्थित जमीन मालकांनी तुम्ही ज्या जमिनीची मोजणी करणार त्याची बॉण्ड्री दाखवा असे सांगितले. यावेळी श्रीमती मठकर व आम्ही सर्वांनी बॉण्ड्री दाखवली. याच दरम्यान उमेश वाळके व सोहम वाळके यांनी आम्हाला ही जमीन मोजणी मान्य नाही. असे सांगत शासकीय कामात अडथळा आणत "आम्ही सोबत मसाला आणला आहे. तो डोळ्यात टाकू" असे सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.