पहिल्या श्रावण सोमवारी पाटेश्वर चरणी भक्तगण नतमस्तक

Edited by: विनायक गांवस
Published on: August 05, 2024 11:46 AM
views 94  views

सावंतवाडी : सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजघराण्याच दैवत श्री देव पाटेश्वर चरणी पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भक्तगण नतमस्तक झाले. पहाटे राजेसाहेब खेम सावंत भोसले यांच्या हस्ते देवाची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवघर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले‌. गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक देखील दर्शनासाठी आले होते. पहाटे राजेसाहेब खेम सावंत भोसले यांच्या हस्ते देव पाटेकराची पूजा करण्यात आली.

बऱ्याच काळानंतर श्रावणाची सुरुवात सोमवारी झाल्यानं भाविकांनी राजवाडा येथील मंदीरात गर्दी केली होती.  बेल, फुल, श्रीफळ अर्पण करून देवाचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर देवघर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले‌. गोवा, कर्नाटक राज्यातील शेकडो भाविक देखील दर्शनासाठी आले होते. सायंकाळी योगेश बोरचाटे प्रस्तुत स्वरसाधना मंडळ माणगाव यांचा संगीत कार्यक्रम पार पडला. त्यांच्या गीतान रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. 

तसेच येणाऱ्या सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कालिका देवी भजन मंडळ (कारिवडे) यांचे भजन, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता हुमरस ग्रामस्थ मंडळ (हुमरस) यांचे भजन, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता विणा दळवी प्रस्तुत श्री राधाकृष्ण संगीत साधना, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भजन होणार आहेत. दर श्रावण सोमवारी सकाळी ८ ते रात्री ८.३० पर्यंत श्री पाटेकर दर्शनाची वेळ ठेवण्यात आली आहे. भाविकांनी यावेळी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानतर्फे करण्यात आले आहे.