
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात उच्छाद माजविणाऱ्या ओंकार हत्ती डोंगरपाल, नेतर्डे येथून गोवा राज्यात गेला होता. मात्र तो पुन्हा सोमवारी रात्री परत गाळेल, बांदा गोवा हद्दीवर आल्याचे वनविभागाने सांगितले व त्याचे व्हिडीओ देखिल सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मंगळवारी सकाळी हत्ती गोवा हद्द तोर्से पेट्रोल पंप शेजारी असल्याचे वनविभागाने सांगितले.
दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱ्यात हैदोस माजवून मोर्ले येथे एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी घेतलेला ओंकार नामक हत्ती भिकेकोनाळ, कळणे मार्गे सावंवाडी तालुक्यातील डोंगरपाल, नेतर्डे, गोवा मोपा, गाळेल, बांदा गोवा हद्द या ठिकाणी सध्या येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करत आहेत. सोमवारी सकाळी नेतर्डे येथील खोलबागवाडी येथे काजू बागयतीत होता. सोमवारी रात्री तो गाळेल, फकीरपाठा प्राथमिक शाळेच्या शेजारी केळी बागयतीत नासधूस करत होता. मध्यरात्री तो पत्रादेवी बांदा - गोवा हद्द येथे पोहचल्याचा व्हिडीओ ही सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. मंगळवारी सकाळी गोव्यातील तोर्से गावात हत्ती गेल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
वनविभागकडून सतर्कतेचा इशारा
दरम्यान, सावंतवाडी वनविभागाकडून डोंगरपाल, गाळेल, नेतर्डे, पत्रादेवी, फकीरपाठा आदी गावांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लहान मुले, वयोवृद्ध, वाहन चालकांनी विनाकारण बाहेर पडू नये. रात्रीच्या वेळेस घरा बाहेर कोणीही फिरू नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
कदाचित ओंकारचे भांडण
ओंकार हत्ती दोडामार्ग तालुका सोडून सावंतवाडी तालुक्यात येण्याचे कारण वनविभागाला विचारले असता ते म्हणाले की जस बाहुबली व गणेशच भांडण होऊन बाहुबली 'त्या' कळपातून बाहेर पडला आणि आता तो आंबोलीत आहे. तसेच गणेश व ओंकारच भांडण झालं असेल म्हणून तो ओंकार कळपातून बाहेर पडून सावंतवाडी तालुक्यात गेला अस वनविभागाचं म्हणणं आहे. नेतर्डे, गाळेल, डोंगरपाल व गोवा याठीकाणी त्याला हव तस पोट भर खाद्य मिळत आहे म्हणून तो सध्या इकडे राहिला आहे. परंतु तो पुन्हा दोडामार्गच्या दिशेने जाणार असा ही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.