चिवला बीच इथं 13 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा

सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 20, 2023 20:54 PM
views 333  views

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना व मालवण पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच वर १६ व १७ डिसेंबर रोजी १३ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १३ वर्ष ही स्पर्धा होत असून स्थानिकांसह अनेकांचे तसेच मालवण नगरपरिषद प्रशासनाचे सहकार्य स्पर्धेला लाभत आहे. यावर्षी रोटरी क्लब मालवण तसेच अन्य काही सामाजिक स्तरावरून सहकार्य लाभत असल्याचे दीपक परब यांनी सांगितले. 

मालवण नगरपालिका येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी अरुण जगताप, नीलकंठ अखाडे, युसुफ चुडेसरा, नील लब्दे, सुधीर साळसकर, गुरु राणे, आदी उपस्थित होते.

 २००९ पासून सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण चिवला बीच येथे आयोजन केले जात आहे. यावर्षी १६ व १७ डिसेंबर रोजी चिवला बीच येथे होणारी तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा ही संपूर्ण भारतातील विशेष अशी स्पर्धा असून या स्पर्धेत ६ वयापासून ते ७५ वयाहून अधिक स्पर्धक भाग घेत असलेली एकमेव स्पर्धा आहे.

तीन पिढ्या मुलगा, वडील, आजोबा एकत्र होणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दिव्यांग जलतरणपटू साठी एका वेगळ्या गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेचे मेडल, सहभाग प्रमाणपत्र व टी-शर्ट देण्यात येणार आहे तसेच ग्रुपमध्ये पहिल्या दहा विजेत्याला प्रथम, द्वितीय व तृतीय यांना मेडल, रोख बक्षीस, टी-शर्ट, प्रमाणपत्र, नॅपकिन, बॅग, वॉटरबॉटल इत्यादी वस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धकांचे रजिस्ट्रेशन १५ व १६ डिसेंबर रोजी पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी १६ तारखेला एक किलोमीटर, दोन किलोमीटर, तीन किलोमीटर, पाच किलोमीटर या सर्व ग्रुप ची स्पर्धा होणार असून १७ डिसेंबर रोजी पाचशे मीटर, दहा किलोमीटर, एक किलोमीटर, दोन किलोमीटर फिन्स सागरी जलतरण तसेच दिव्यांग जलतरणपटूंची स्पर्धा होणार आहे. त्याचे रजिस्ट्रेशन मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. स्थानिक मालवण वासीयांसाठी १५ डिसेंबर रोजी बीच कबड्डी व नौकानयन स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. 

२००९ रोजी पहिल्या स्पर्धेत २५३ स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यानंतर यात स्पर्धकांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या बारा वर्षात एकूण बारा हजार स्पर्धकांनी ही स्पर्धा पूर्ण होती. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातून विविध बारा वयोगटातून लहानात लहान ६ ते ७५ वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक जलतरणपटूंना मेडल व प्रशस्तीपत्र दिले जाते. या स्पर्धेच्या निमित्ताने तालुक्यातील पर्यटनालाही चालना मिळाली आहे. या स्पर्धा आयोजनासाठी मालवण पालिकेने मोलाची मदत केली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रशासनाचे सर्व विभाग सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक मालवणवासीयांचे सहकार्य मिळत आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक, आमदार व खासदार यांचेही मोलाचे सहकार्य मिळत असल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे. या सागरी जलतरण स्पर्धेमुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली व स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. स्थानिकांकडून ही स्पर्धकाचे योग्यरीतीने आदरातिथ्य केले जात आहे. दिव्यांग /अपंग जलतरणपटूना विशेष सहाय्य व प्रोत्साहन दिले जात आहे. अशी माहिती जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी दिली.

रजिस्ट्रेशन तसेच स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी स्थानिक स्पर्धकांनी सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे उपाध्यक्ष बाबा परब व निल लब्दे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


यावर्षी प्रथमच दहा किलोमीटर फिन्स सागरी जलतरण स्पर्धा

यावर्षी महाराष्ट्रात (चिवला बीच) प्रथमच दहा किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा व देशातील पहिली फिन्स सागरी जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. निवडक व निमंत्रित स्वरूपात प्रत्येक राज्यातील स्पर्धक यात सहभागी असणार आहेत.