
महसूल अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कारवाई
दोडामार्ग : अनधिकृत बिनशेती बांधकामाची मोजमापे करण्यासाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांना डांबून ठेवून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तळेखोल येथील ‘बीआर फार्महाऊस’चे मालक भरत सुरेश महाले आणि त्यांच्या कामगार (गवस) यांच्याविरुद्ध दोडामार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० ते ३.०० वा. या वेळेत तळेखोल गावातील सर्व्हे क्र. ५८/१ मधील बीआर फार्महाऊसमधील अनधिकृत बिनशेती बांधकामाची तपासणी व मोजमाप करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी सुयोग सुनील चौगुले व त्यांचे सहकारी लीलाचंद गणपत जाधव हे गेले होते.
त्यावेळी फोनवरून मालक भरत महाले यांनी “मोजमाप करू नका, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर महाले यांच्या आदेशानुसार कामगार गवस याने फार्महाऊसचे मुख्य गेट आतून कुलूप लावून दोन्ही महसूल अधिकाऱ्यांना आत डांबून ठेवले.
यानंतर महाले स्वतः घटनास्थळी आले. शासकीय ओळखपत्र दाखवूनही अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत “नोकरीवरून काढून टाकीन” तसेच “पाण्याच्या टाकीत टाकून मारून टाकीन” अशा जिवे मारण्याच्या धमक्या त्यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आपण गोव्यात बीडीओ असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
दरम्यान, महसूल अधिकाऱ्यांनी परिस्थितीची माहिती तहसीलदार राहुल गुरव यांना दिली. ते नायब तहसीलदार व कर्मचारींसह घटनास्थळी आले असता महाले यांनी तहसीलदारांशीही अरेरावीची भाषा वापरल्याचे सांगण्यात येते.
तहसीलदारांच्या सूचनेनुसार दि. ०३ डिसेंबर रोजी महसूल अधिकारी सुयोग चौगुले यांनी दोडामार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार भरत सुरेश महाले व कामगार गवस यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, डांबून ठेवणे व जिवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर आरोपांखाली कारवाई सुरू करण्यात आली आहे.










