हेमलता बुरटे यांच्यासाठी O - रक्तदात्यांची तत्परता

ब्लड लाईन ग्रुपचे सेवाभावी योगदान
Edited by: मनोज पवार
Published on: June 25, 2025 16:01 PM
views 104  views

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा हेमलताताई बुरटे या सध्या रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांदरम्यान त्यांना ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाच्या चार बॅग्सची तातडीची आवश्यकता निर्माण झाली होती. ही गरज लक्षात येताच ब्लड लाईन ग्रुप – चिपळूण या सेवाभावी संस्थेचे चार सदस्य मदतीस धावून आले आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण घडवले.

या संकटसमयी कृष्णा अँटिऑक्सिडंट कंपनीचे व्यवस्थापक (एचआर) सुयोग चव्हाण यांनी त्यांच्या सोळाव्या वेळेस रक्तदान करत पुढाकार घेतला. त्यांच्यासोबत समाधान मुळे यांनी आपल्या ५२व्या वेळेस रक्तदान करत या सेवेत आपली सातत्यपूर्ण निष्ठा दाखवून दिली. याशिवाय पंकज आवले आणि भावीन कटारिया यांनीही रक्तदान करून आपला माणुसकीचा हात पुढे केला.

चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील भक्तश्रेष्ठ वालावलकर रुग्णालयात हे चारही रक्तदाते प्रत्यक्ष जाऊन माजी नगराध्यक्षा हेमलताताई बुरटे यांच्यासाठी रक्तदान केले. त्यांच्या या सेवाभावी कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

या चारही सेवकांच्या कार्यातून “रक्तदान हेच खरे जीवनदान” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ब्लड लाईन ग्रुपच्या या योगदानामुळे बुरटे यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकले, हे विशेष.