हत्तींचा उपद्रव | आंबोली वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 19:05 PM
views 65  views

आंबोली : आंबोलीमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या शेवटी चंदगड घाटकरवाडी या परिसरातून एक हत्ती आंबोली गडदूवाडी नांगरतास परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीचे नुकसान करत आहे. याही वर्षी हा हत्ती गेले दहा दिवस आंबोलीमध्ये वास्तव्यास होता. या दहा दिवसांमध्ये त्यांनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे बरेच नुकसान केले आहे. गेल्यावर्षीची नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. त्यात यंदाही मोठ्या प्रमाणावर शेतीचे व पाण्याचे पंप यांचे नुकसान झाले आहे. याबाबत आंबोली ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावर्षीही ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर मंगळवारी सकाळपासून आंबोली वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.

मात्र, या आंदोलनाची दखल सायंकाळी उशिरापर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली नसल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर यांनी सांगितले. संतोष पालेकर यांच्या म्हणण्यानुसार हा हत्ती मुका प्राणी आहे. त्या त्या प्राण्याला वनविभागच सिंधुदुर्गतून कोल्हापूर हद्दीत हाकलत आहे. तर कोल्हापूर हद्दीतून वनविभागाचेच कर्मचारी पुन्हा सिंधुदुर्गाच्या हद्दीमध्ये हाकलत आहेत. त्यामुळे तो हत्ती सुद्धा सैरभैर झालेला आहे. तो मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहे. अद्याप पर्यंत जीवित हानी झालेली नाही. परंतु भविष्यात जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणचे वनमजूर हे अरेरावेची भाषा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कोल्हापूर वन विभाग व सिंधुदुर्ग वन विभाग यांनी संयुक्त विद्यमाने या हत्तीला त्याच्या मुख्य अधिवासामध्ये नेऊन सोडावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत शेकडो ग्रामस्थ वनविभाग कार्यालयाजवळ उपस्थित होते.वनविभागाने जर आम्हाला ठोस आश्वासन दिले नाही तर ठिय्या आंदोलन वनविभागाच्या कार्यालयात मुक्काम करून आम्ही चालूच ठेवू असे त्यांनी सांगितले. यावेळी अंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष पालेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाची जमीन असल्याने नुकसान भरपाई देणे सुध्दा शक्य होत नाही.  तर वनमंत्रालयाकडून सेज फाउंडेशन बंगाल यांची एक रिसर्च टीम हत्तीच्या अधिवासात बाबत आणि त्याच्या एकंदरीत इजा करण्याच्या वाटा आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टीम आलेली आहे. त्या टीमचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर या हत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले.