आता ऐक्याची ज्योत पेटवा ; महामानवाच्या जयंतीदिनी अन्वर खान यांचा संदेश

सिंधुदुर्गात ऐक्याची ज्योत दोडामार्ग तालुक्यातून पेटवली जावी : अन्वर खान
Edited by: संदीप देसाई
Published on: April 15, 2023 20:08 PM
views 102  views

दोडामार्ग : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखंड मानव जातीला समतेचा संदेश दिला आहे. अजूनही समाज एकत्रित नसून तो विखुरलेला आहे. हा समाज एकाच झेंड्याखाली आला पाहिजे. सिंधुदुर्गात ऐक्याची ज्योत दोडामार्ग तालुक्यातून पेटवली जावी, असा संदेश प्राचार्य अन्वर खान यांनी व्यक्त केली.


महाराजा हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आरपीआय आठवले गट (सिंधुदुर्ग), बौद्ध हितवर्धक महासंघ (मुंबई), भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, युवा परिवर्तन संस्था यांच्यावतीने गठित उत्सव समितीकडून आयोजित करण्यात आला होता.

       यावेळी व्यासपीठावर आरपीआय प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, उत्सव समिती अध्यक्ष शंकर जाधव, दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संदीप देसाई, बुद्धभूषण हेवाळकर, अर्जुन आयनोडकर, अर्जुन कदम, संतोष जाधव, शंकर जाधव आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

      यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. खान पुढे म्हणाले की आज दलित वस्त्या सुधारत आहेत. पण वस्त्यांमधील सामाजिक, आर्थिक प्रगती झाली का? याकडे दलित बांधवांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. जिल्हयात दलित बांधवांचा अजूनही एक संघपणा दिसत नाही. तो दिसण्यासाठी ऐक्याची मशाल दोडामार्ग तालुक्यातून पेटवा असा संदेश त्यांनी या निमित्ताने दिला.

       माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आजचा दिवस अविस्मरणीय असा आहे. त्यांनी समाजासाठी प्रचंड संघर्ष केला. माणसाचे जे काय हक्क असतात ते मिळवून दिले. आम्हाला ताठ मानेने जगायला शिकविले. असत्याच्या विरुद्ध पेटून उठले पाहिजे, असे अधिकार दिले असताना आपला समाज अजूनही पेटून उठत नाही. असं होऊन चालणार नाही, स्वस्त बसू नका, असा मौलिक विचार मांडला.         


प्रदेश सहसचिव रमाकांत जाधव यांनी देखील एका छताखाली येऊन काम करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज एकत्र राहून काम करूया, असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात पत्रकार समिती अध्यक्ष संदीप देसाई, तेजस देसाई, रत्नदीप गवस, शंकर जाधव, अर्जुन कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी तर सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले.  आभार बुधाजी जाधव यांनी मानले.