मोहन वाडकर यांची उपोषणाची नोटीस

Edited by: विनायक गांवस
Published on: August 06, 2024 09:46 AM
views 212  views

सावंतवाडी : भूसंपादन आणि नुकसान भरपाई प्रकरणी वर्षभरापूर्वी नगरपालिका प्रशासनाने आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता न झाल्याने सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मोहन वाडकर यांनी १५ आॅगस्ट रोजी उपोषणास बसण्याची नोटीस मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना दिली आहे.

उपोषणासंबधीचे पत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण,शिक्षणमंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी, तहसीलदार,सहायक आयुक्त नगरविकास विभाग यांना देण्यात आली आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी यासंदर्भात प्रशासनाला प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.तावडे यांचे उपस्थितीत दिल्या होत्या. त्या नंतर सातत्याने वर्षभर सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलकडून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष द.म.गोठोसकर यांनी वारंवार पालिका प्रशासनाला भेटून विनवण्या केल्या. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र पालिका प्रशासनाने अद्याप परिपूर्ण प्रस्ताव केलेला नाही. 

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून संयुक्त मोजणी झाली. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने बांधकाम विभागाचे श्री.पिंगुळकर उपस्थित होते.मोजणी वेळी सव्हेँ नंबर 5068ही जमीन हद्द नकाशा नुसार सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या मालकीची असल्याचे सिध्द झाले. या जमिनीत पालिका रस्ता काढला मच्छी माकेँटचे काही काम केले. शहरातील एवढी मोक्याची जागा घेत असताना तत्कालीन परिस्थितीत भूसंपादन करण्याचे राहून गेले. याबाबत जिल्हा प्रशासनाचे मार्गदर्शन मागविण्यात आले. जिल्हा प्रशासनाने ही पालिका प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात  जिल्हाधिकारी, सह आयुक्त नगरविकास विभाग, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार झाला आहे. परंतु हे काम काहीसे रेंगाळले आहे. याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी श्री.वाडकर यांनी उपोषणाची नोटीस दिली आहे. प्रशासनाने उचित कार्यवाही न केल्यास येत्या १५ आॅगस्टला शाळेसमोर उपोषणास बसावे लागेल, असे नोटीसीत लिहीले आहे. यासंदर्भात संस्थेचे सभासद, माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षणप्रेमी नागरीक यांना सहकार्याचे आवाहन केले आहे.