भरपाई देणारच, पण मार्गदर्शनही उपलब्‍ध करून देणार

पालकमंत्री नितेश राणेंचे आंबा उत्‍पादकांसाठी ठोस पाऊल
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 07, 2026 20:59 PM
views 14  views

कणकवली : यावर्षी जिल्‍ह्यात आंब्‍याची मोठी नुकसानी झाली आहे. जवळपास ८० ते ८५ टक्‍के एवढे नुकसान झाले आहे. याबाबतच बारामती येथील ॲग्रीकल्‍चर डेव्‍हलपमेंट ट्रस्ट (एडीटी )या शेती व अन्‍य विषयांमध्‍ये वर्षानुवषर्षे कार्यरत असलेल्‍या संस्‍थेची मदत घेतली जाणार आहे. त्‍यातून आंबा उत्‍पादन वाढ, नुकसान होऊ नये, आदींबाबत आंबा उत्‍पादकांना मार्गदर्शन उपलब्‍ध होणार असल्‍याची माहिती पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली. तर आंबा उत्‍पादकांना नुकसान भरपाई देण्‍यासाठी सरकारही अनुकुल असल्‍याचे राणे यांनी सांगितले.

प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री .राणे म्‍हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार आंबा शेतकरी हवालदिल झाले आहे. वास्तविक आंबा बागायतदारांनी नुकसान भरपाई मागितली, असे मागील ५० ते ६० वर्षात कधी झाले नाही. सिंधुदुर्गच्या अर्थकारणात आंबा, काजू, मासेमारी यांचे योगदान खूप मोठे आहे. म्हणूनच यावर्षी आंबा उत्‍पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्‍याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष वेधले. शासनातर्फे याबाबत रिपोर्ट मागविण्यात आला होता. त्यानुसार यावर्षी नैसर्गिक कारणामुळे, वातावरणातील बदलामुळे ८० ते ८५ टक्के एवढे आंब्याचे नुकसान झाले आहे. सहाजिकच आंबा बागायतदार सध्या नुकसानग्रस्त स्थितीत आहेत, याविषयी सरकारच्या मनात देखील तीळ मात्र शंका नाही, असेही राणे म्‍हणाले. 

राणे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील आंबा बागायतदारांनी नुकतीच मंत्रालयात माझी भेट घेतली, त्यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. शासनाने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही मागणी होतीच. मात्र सातत्याने होत असलेल्या नुकसानीबाबत मार्गदर्शन मिळवून देण्याची मागणीही आंबा बागायतदारांनी केली.

आंबा उत्‍पादकांच्‍या मागणीनुसार मी अनेकांशी चर्चा केली. बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था वर्षानुवर्षे कृषीसह महिला सक्षमीकरण व इतर क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्‍थेने मायक्रोसोफ्ट, ऑक्सफर्ड, बिल गेट्स फाउंडेशन आधी मोठ्या संस्थांच्या माध्यमातून कृषी संशोधन केंद्र उभारले आहे. भविष्यातील शेती व त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा पर्याय अशा माध्यमातून या संस्थेकडून प्रभावी संशोधन सुरू आहे. या संस्थेतील अधिकारी श्री. नलावडे यांची भेट घेतली. आंबा उत्पादकांनी दिलेली निवेदने नलावडे यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर नलावडे यांनी दहा दिवसांनी माझ्याकडे रिपोर्ट सादर केला. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली अशा माध्यमातून उत्पादन क्षमता वाढवणे, हवामानामुळे होणारे नुकसान कमी करणे, आंबा उत्पादकांना चांगल्या दर्जाची औषधी उपलब्ध होत नाहीत याविषयी संशोधन करणे, अनियमित फुलोरा, कीड रोगाचा प्रादुर्भाव याबाबत 'दी लेव्‍हल प्रोसेसिंग मार्केटिंग सिस्टम' तयार करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. हवामानाचा अंदाज यावा यासाठी अचूक हवामान प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. आंबा बागायतदारांना वेळोवेळी मार्गदर्शनही करण्यात येईल. आंबा उत्पादनामध्ये वाढ व्हावी हाच यामागचा उद्देश असल्याचे राणे म्हणाले.

ही सिस्टम राबवण्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च येणार आहे. हा खर्च जिल्हा नियोजन मधून दिला जाईल. एकीकडे आंबा उत्पादकांना सरकारी मदत करणे व भविष्यात अशी संकटे वारंवार येऊ नयेत त्यासाठी उपाययोजना करणे असा दुहेरी कार्यक्रम आम्ही राबवत आहोत, असेही राणे म्‍हणाले.

वातावरण खराब करण्‍याचा प्रयत्‍न नको

आंबा नुकसानीबाबतच्या पहिल्या पंचनाम्‍यावेळी मी देखील समाधानी नव्हतो. म्हणूनच पुन्हा एकदा पंचनामा करण्याचे मी आदेश दिले होते. त्यामुळे आंबा बागायतदारांच्या प्रश्नांवर कुणी मोर्चा काढावा, हा त्यांचा अधिकार आहे. मात्र पालकमंत्री म्हणून मी सदैव आंबा बागायतदारांच्या सोबत आहे. वास्तविक मी सर्वांशी चांगला संवाद ठेवला आहे. त्यामुळे कोणीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करू नये. मी देखील मोर्चातून, विरोधी पक्षातूनच तयार झालेला कार्यकर्ता आहे. तर शासनाची भूमिका आंबा बागायतदारांपेक्षा अजिबात वेगळी नाही. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवूया, असे आवाहनही राणे यांनी केले. विरोधकांनी आयोजित केलेल्या मोर्चामध्ये राजकारण दिसते. वास्तविक संवाद कमी पडला तर अशी आंदोलने होतात. मात्र मी सर्वांशी बोलायला तयार आहे. सरकार म्हणून आम्ही कुठेच कमी पडत नाही. माजी खासदार राजू शेट्टी हे आमचे हितचिंतक आहेत, असेही राणे म्‍हणाले.

… तर कामही चोख करा

नुकसानीबाबत आंबा संशोधन केंद्राची जबाबदारी तेवढीच मोठी आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या कामावर मी देखील नाराज आहे. कारण ते योग्य मार्गदर्शन करत नाहीत. त्यामध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. कारण सरकारचा पगार घेणार्‍यांनी आपले काम चोख करावे. तर आंबा प्रश्नाबाबत संशोधनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लॅब उभारली जावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मला केली आहे. त्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचे नितेश राणे म्हणाले.