शून्य शिक्षकी शाळा व्यवस्थापनाचा अतिरिक्त ताण कार्यरत शिक्षकांवर नको

सकारात्मक चर्चा ; शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन मागे
Edited by: संदीप देसाई
Published on: July 03, 2023 20:39 PM
views 155  views

दोडामार्ग : शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न जिल्हाभर गाजत असताना त्यावर असलेल्या शाळेतून कामगिरीवर शिक्षक काढून शून्य शिक्षकी शाळा चालविण्यासाठी शिक्षण विभाग शिक्षकांवरच अधिक ताण आणू लागल्याने दोडामार्ग तालुक्यातील शिक्षक भारतीनं त्या विरोधात एल्गार छेडत दिल्या इशाऱ्या प्रमाणे सोमवारी येथील गटशिक्षण अधिकारी निसार नदाफ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याने शिक्षक भारतीने एक पाऊल मागे येत शिक्षण विभागा विरोधात सोमवारी नियोजित केलेलं धरणे आंदोलन मागे घेतल. 

         सकारात्मक चर्चा झाल्याने शिक्षक भारतीने सोमवारी दुपारनंतर नियोजित केलेले धरणे आंदोलन मागे घेत शिक्षण विभागाला सहकार्य केलं आहे. दरम्यान याबाबत सोमवारी शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी दोडामार्ग तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल होत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच आश्वासन गटशिक्षणाधिकारी नदाफ यांनी प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले आहे. त्यामुळे नियोजित धरणे आंदोलन शिक्षक भारतीने मागे घेत शिक्षण विभागाला सहकार्य केलं. यावेळी शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष मणिपाल राऊळ, राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक, जिल्हा सरचिटणीस अरुण पवार, रवींद्र देसाई, मुरलीधर भणगे, निलेश सावंत, यशवंत गवस, सिद्धेश रामचंद्र घाडी, पोपट कोळी, रामा गवस, बाबुराव भोगळे, हेमंत सावंत, मनोज गावडे, दत्तप्रसाद देसाई, प्रमोद कुडाळकर, राकेश कर्पे आदी उपस्थित होते.

 शिक्षण विभाग प्राथमिक शाळामधील दोडामार्ग तालुक्यातील रिक्त असलेल्या शिक्षक पदामुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अतिरीक्त कार्यभार पडल्यामुळे शिक्षक तणावपूर्ण वातावरणात वावरत असल्याबाबत प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्गच्यावतीने शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. दोडामार्ग तालुक्यात इ. १ ली ते ४ थी व १ ते ७ वी अशा प्राथमिक शाळा आहेत. या शाळामध्ये शिक्षकांची रिक्त पदे असल्याने कार्यरत शिक्षकांना ४ वा ७ वर्ग सांभाळावे लागतात. शिक्षक एक वर्ग चार अशा वेळी त्यामध्ये चारही वर्गाचे आस्थापन स्वाध्याय तपासणे, प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवणे, शाळेचे प्रत्येक दिवसाचे रजि. नोंद, शा. पो. नियोजन, विद्यार्थी विषयावर प्रगती, त्याबरोबर पालकांचे दाखले देणे या सर्व गोष्टीमुळे शिक्षकांची होणार कसरत होत होती. याचा विचार करुन शासनानं योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी शिक्षक भारतीने केली होती. त्यावर गटशिक्षण अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विविध प्रश्नांवर यशस्वी तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षक भारतीला दिलं आहे.