नितेश राणेंची हिंदुत्ववादी भूमिका मतांसाठी : आ. वैभव नाईक

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 11:15 AM
views 378  views

कणकवली : महाराष्ट्रात हिंदुत्वाची भूमिका घेवून भाजपा आ. नितेश राणे हे फिरण्याचा प्रयत्न करत आहेत. आ.नितेश राणे यांच्याकडून हिंदुत्वाची भूमिका मतांसाठी घेतली जात आहे. कणकवलीत भाजपाचा कार्यकर्ता असलेल्या एकाने धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवत देशद्रोहीपणाची भूमिका घेत असल्याचा पर्दापाश आम्ही केला. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्याच्या पाठीशी कोण ? यासाठी आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत. आपल्याबरोबर असलेला मुस्लिम  देशप्रेमी आणि आपल्याबरोबर नसला तर तो देशद्रोही अशी भूमिका नितेश राणेंची असल्याचा आरोप आ.वैभव नाईक यांनी केला. कणकवली येथील विजय भवन कार्यालयात रविवारी सायंकाळी माध्यमांशी आ. वैभव नाईक यांनी संवाद साधला. 

आपल्याच कार्यकर्त्यांचा वापर करून हा धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे करत आहेत की काय ? याची चौकशी व्हावी. हे मतांसाठी करत असल्याचे काल उघड झाले आहे. त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता असल्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवला होता आणि तो त्यांचाच कार्यकर्ता होता हे आम्ही सिध्द केले. सकाळी त्याच्या विरोधात आंदोलन झाले आणि सायंकाळी त्यालाच घेवून पोलिस स्टेशनवर जाण्याचे काम आ. नितेश राणे यांनी केले. त्यामुळे हे फक्त राजकारण करत आहेत.  त्याचा पर्दापाश आम्ही  केलेला आहे. सिंधुदुर्गातील सर्वच मुस्लिम बांधव हे देशप्रेमी आहेत. परंतु त्यांचाच कार्यकर्ता असलेला धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुद्दामहून करत असल्याचे आढळून आले.

सिंधुदुर्गात धार्मिक निर्माण तेढ करण्यासाठीचा प्रयत्न भाजपचेच कार्यकर्ते मुद्दामहून करत असून त्याला आ. नितेश राणे यांचा पडद्यामागून  पाठिंबा आहे का? हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.