नितेश राणे-केसरकरांची मैत्री असेल, त्याच्याशी घेणं देणं नाही : राजन तेली

केसरकरांची वस्तुस्थिती शिंदेंना सांगणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: March 14, 2023 17:27 PM
views 184  views

सावंतवाडी : आमचे सहकारी मित्र यांनी एक विधान केलं. मी निवडणूक प्रामाणिकपणे लढवली. कुठेही लाचारी केली नाही अन् करणार नाही. भाजपची एकमेव बांदा ग्रामपंचायत असताना पक्षाचं प्राबल्य नसताना निवडणूक लढवली‌. नारायण राणे, शरद पवार, उद्धव ठाकरेंना माझा स्वार्थासाठी शिव्या घालून मी लढलो नाही. गरज असेपर्यंत कुणाचा जयजयकार केला नाही. असं स्वार्थी राजकारण मी केलं नाही. पराभुत झालो तरी कुणी तांब्रपट घेऊन आलं नाही. माझी विधानपरिषद शिफारस करण्यापेक्षा तुमचा किती ग्रामपंचायती आल्या हे पहा. जिल्हा परिषद, पंचायत समितीत तुमचा पक्षाची ताकद समजेल. वरचा नेत्यांना मध्ये न आणता तुम्ही चांगल काम केल असेल तर एकदा काय ते होऊन जाऊदे, युतीची गरज तुम्हाला का लागतेय ? असा सवाल भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी करत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेतला.  

ते म्हणाले, आम्ही कुणावर टिका करून राजकारण केलं नाही. गरज संपल्यावर शिव्या घालायची सवय आम्हाला नाही. अशांनी आम्हाला सल्ले देण्याच्या भानगडीत पडू नये. इथली जनता कार्यकर्ते, पक्षाचे वरिष्ठ नेते काय ते ठरवतील. वेळ पडली तर विधानपरिषदेवर मलाच तुमची शिफारस करावी लागेल, अन् ती मी करेन. किती लोक तुमच्या नेतृत्वाकडे आले हे तपासून घ्या, शिवसेनेतून किती आले ? नाही आले तर का नाही आले ? सोबत कोण आहेत ? हे सगळ आमच्या नेत्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इथली वस्तुस्थिती सांगणार आहे. आमच्या नेत्यांकडे जायला लागले तर त्यांच्या नेत्यांकडे आम्हाला जाव लागेल‌. आ. नितेश राणेंनी व्यक्त केलेल मत हे त्यांच वैयक्तिक मत आहे. मी माझी भुमिका जाहीर केली आहे. ते त्यांच मत असेल, त्यांची मैत्री असेल त्याच्याशी माझं घेणं देणं नाही असं मत तेलींनी व्यक्त केले.  

जर कुणाला माहिती नसेल, विसर पडला असेल तर केसरकरांनी कुणाकुणाला शिव्या दिल्यात, अटक होण्यासाठी कुणी प्रयत्न केले याची कात्रणं माझ्याकडे आहेत. मला कुणी सल्ले देऊ नये. मित्रपक्ष आहात तर तसे रहा, आमच्या नेत्यांबद्दल बोलू नका. एवढंच असेल तर भाजपात या, लवकर या असं खुलं आवाहन केल. तर शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील राहणार आहे. शहराला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्य सरकारला घेण्यास विनंती केली आहे. ऐतिहासिक मोती तलावाच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी ५० कोटींची मागणी केली आहे. याबाबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री लोढा, विधानसभा अध्यक्ष शहराचे सुपुत्र अँड. राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आहे. नागपुरचा गडकरी पॅटर्न सावंतवाडी मोती तलावात राबविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे अशी माहिती राजन तेली यांनी दिली. यावेळी भाजप जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रविंद्र मडगावकर, माजी सभापती अँड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक, महेश धुरी, आनंद नेवगी, अँड. संजू शिरोडकर आदी उपस्थित होते.