
कणकवली : जगातील बहुतांशी देश एआय (कृत्रिम बुद्धिमता)च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तंत्रज्ञान व एआयमुळे सर्वच क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल घडून येत आहेत. एआय प्रणालीचा वापर करणारा देशातील सिंधुदुर्ग पहिला जिल्हा आहे. एआयच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम प्रामाणिकपणे व सातत्याने होत आहे. प्रतिष्ठानचे कार्य अतुलनीय आहे. शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच विकसित देशांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळते, तसे शिक्षण द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. युवा संदेश प्रतिष्ठानचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम स्तुत्य असून यापुढील प्रतिष्ठानच्या प्रत्येक उपक्रमास माझे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील मंत्री राणेंनी दिली.
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते. यावेळी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा माजी जि.प. अध्यक्षा सौ. संजना सावंत, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, माजी पंचायत समिती सदस्य राजू पेडणेकर, सुरेश ढवळ, भाजपचे अनुसूचित जातीचे सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, विजय भोगटे, सुनील घाडीगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नीतेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची मी जबाबदारी हाती घेतल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हा प्रशासन गतिमान करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. एआय प्रणालीचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पाहिला जिल्हा ठरला आहे. एआय प्रणालीचा सर्व क्षेत्रात प्रभावीपणे वापर करून महाराष्ट्रात सर्वांत फास्ट गतीने प्रशासकीय कारभार करणारा सिंधुदुर्ग जिल्हा बनविण्याचा माझा मानस आहे. येणारा काळ एआयचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी एआयचा वापर केला पाहिजे.
युवा संदेश प्रतिष्ठानचे कौतुक
युवा संदेश प्रतिष्ठानचे शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम स्तुत्य आहेत. प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडून आले आहे. २० वर्षे उपक्रम सुरु ठेवणे ही सोपी गोष्ट नाही. परंतु संदेश सावंत, संजना सावंत व त्यांचे सहकारी प्रतिष्ठानचे सर्व उपक्रम प्रामाणिकपणे व सातत्यपूर्ण राबवित आहेत. सिंधुदुर्गच्या शैक्षणिक जडणघडणीत संदेश युवा प्रतिष्ठानचा सिंहाचा वाटा आहे. युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणाऱ्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमुळे जिल्ह्यातील शिक्षणाचा पाया अधिक मजबूत होत आहे. प्रतिष्ठानने आपल्या उपक्रमांमध्ये सातत्य राखावे. एआय वापर विद्यार्थ्यांनी करावा यासाठी नवा उपक्रम हाती घ्यावा, त्या उपक्रमास मी सहकार्य करेन, असेही राणे म्हणाले.
रवींद्र खेबुडकर म्हणाले, लहानपणी मला स्पर्धा परीक्षांचे बाळकडू पाजल्यामुळे मी सीईओ पदापर्यंत पोहोचू शकलो. दहावी व बारावीची परीक्षा ही सबजेक्टिव्ह असते, स्पर्धा परीक्षा ही ऑबजेक्टिव्ह असते. सबजेक्टिव्ह परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तर जास्त शब्दांत लिहायचे असते. ऑबजेक्टिव्ह परीक्षेत चारपैकी एक अचूक उत्तर लिहायचे असते. हा सबजेक्टिव्ह व ऑबजेक्टिव्ह परीक्षांमधील फरक आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात सबजेक्टिव्ह व आऑबजेक्टिव्हसारखे असले पाहिजे. नोकरी किंवा व्यवसाय करताना ऑबजेक्टिव्ह तर कौटुंबिक आयुष्यात सबजेक्टिव्हप्रमाणे दृष्टिकोन ठेवला पाहिजे. युवा संदेश प्रतिष्ठान ३६५ दिवसांपैकी १०० दिवस विविध उपक्रम राबवते असते. १०० दिवस उपक्रम राबविणारी महाराष्ट्रातील ही पहिली संस्था आहे. युवा संदेश प्रतिष्ठानचा सिधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा उपक्रम स्तुत्य असून भविष्यात जिल्ह्यातून अधिकारी तयार झालेले दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संदेश उर्फ गोट्या सावंत म्हणाले, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यांनी मला ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. त्यानुसार मी आणि माझे कार्यकर्ते काम करीत आहोत. युवा संदेश प्रतिष्ठान ३६५ दिवसांपैकी १०० दिवस शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवत आहे. सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा ८ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. आता ही परीक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात घेतली जात आहे. ही परीक्षा यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक शैक्षणिक कामकाज सांभाळून स्वत:चा वेळ देत आहेत, याबद्दल त्यांनी शिक्षकांचे जाहीररीत्या आभार मानले.
अरुण चव्हाण, किशोर गवस यांनी मनोगत व्यक्त करून युवा संदेश प्रतिष्ठानाच्या उपक्रमांचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. युवा संदेश आदर्श पुरस्कार बाबुशेठ कोरगावकर, दिव्या बाणे यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे पालकमंत्र्यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बाबुशेठ कोरगावकर, दिव्या बाणे व इस्त्रोची सफर केलेल्या वृंदा आडवण, डेयिशा सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना इस्त्रो सफरीतील अनुभव शेअर केले. प्रास्ताविक सुशांत मर्गज यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप तांबे यांनी केले. यावेळी शिक्षक, शिक्षिका व युवा संदेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.