
रत्नागिरी : “कोकण किनारपट्टीचा सर्वांगीण विकास आणि मच्छीमार समाजाच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत. अतिक्रमणसारख्या अडथळ्यांवर मात करत मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पा प्रत्यक्षात आणला असून, येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करून मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारा विकास इथेच साकार होईल,” असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी रविवारी रत्नागिरी येथे व्यक्त केला.
मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन ना. राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आरोग्य सभापती बाबू म्हाप, शिवसेना शहराध्यक्ष बिपीन बंदरकर, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, माजी नगरसेवक राजन शेट्ये, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, तालुकाध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, प्रतीक देसाई यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, पोलीस अधिकारी व मोठ्या संख्येने स्थानिक मच्छीमार उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना उद्देशून बोलताना ना. नितेश राणे म्हणाले, “महायुती सरकार सत्तेत आल्यावर आम्ही कोकण किनारपट्टीच्या सशक्तीकरणासाठी पावले उचलली. मिरकरवाडा बंदराचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा होता. मात्र, अतिक्रमणामुळे हा प्रकल्प खोळंबला होता. काहींनी जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केले, पण आम्ही निर्णयावर ठाम राहिलो आणि त्यामुळेच आजचा हा विकासाचा दिवस शक्य झाला.”
ते पुढे म्हणाले, “हे सरकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहे. ‘भारत माता की जय’ म्हणणाऱ्या आणि देशाशी निष्ठा असलेल्या प्रत्येक नागरिकाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बंदराच्या दुसऱ्या टप्प्यात साठवण क्षमता वाढविणे, बर्फ कारखाने, सांडपाणी व्यवस्थापन, आधुनिक मासेमारी यंत्रणा, आणि मच्छिमारांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा यांचा समावेश आहे.”
या अंमलबजावणीत पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. “सामंत यांच्या सहकार्यामुळेच अतिक्रमणसारखा कठोर निर्णय अमलात आणता आला. आता तिसऱ्या टप्प्याच्या विकासासाठी आम्ही सज्ज आहोत,” असे सांगून, “आजचा हा विकासदृष्टीकोन मच्छीमार समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे,” अशी ग्वाही ना. राणे यांनी दिली.