
कणकवली : तालुक्यातील वाघेरी ग्रामविकास मंडळ,मुंबईच्या पदाधिकारी व सदस्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे जुहू निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी आपण मांडलेल्या मुद्यांबाबत सकारात्मक विचार करून वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी दिले.
यावेळी वाघेरी ग्राम विकास मंडळ,मुंबईचे अध्यक्ष प्रमोद रावराणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय रावराणे, सचिव डॉ. संतोष रावराणे, खजिनदार सूर्यकांत गुरव, सल्लागार व्यंकटेश रावराणे,सदस्य हर्षल रावराणे, मनोज रावराणे, मुकेश रावराणे, महेंद्र रावराणे, जयेश रावराणे, विलास रावराणे, सुनील रावराणे, अनिल मोंडकर, समीर रावराणे, गणेश रावराणे,बाळकृष्ण वाघेरकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी वाघेरी ग्राम विकास मंडळ,मुंबईच्यावतीने पालकमंत्री नितेश राणे यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.यामध्ये आपल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या हजारो एकर उसाची शेती होत आहे. परंतु जिल्ह्यात साखर कारखाना नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना कोल्हापुर ,राधानगरी, गगनबाबडा येथील साखर कारखान्यावर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे ऊसाचा दर देखील कमी मिळतो. तसेच योग्य वेळेत ऊस उचलता जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होते.त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यात सहकारी साखर कारखाना उभारावा. कुर्ली - घोणसरी धरणाचे पाणी कालवा बांधून अजून वाघेरी गावच्या पंचक्रोशीत पोहचले नाही. त्यामुळे जमीन ओलिता खाली आली नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. ऊस लागवड, फळबाग व शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवत आहे.त्यासाठी कालव्याचे काम करण्यात यावे.आपल्या माध्यमातुन वाघेरी- मठखुर्द ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती व विस्तारीकरण तसेच आधुनिकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाघेरी गावातील मोना वहाळाच्या पाण्यात मागील गेली १५ ते २० वर्षापासून सिलीका धुतल्याने सर्व पाणीच केमिकल युक्त झाले आहे. पाणी पिण्यास तसेच कोणत्याही कामासाठी निरुपयोगी झाले आहे. त्या वहाळाच्या बाजुला ग्रामपंचायतीने नळ योजनेची विहीर खोदुन गावाला पिण्याचे पाणी दिलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका संभवतो. तसेच वाळुमुळे नदीतील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतातील झरे बंद झाले आहे. नदीला एप्रिल, मे महिन्यात पाण्याची कमतरता जाणवते. त्यामुळे त्या वहाळातील गाळ उपसा करुन पाण्याचे स्त्रोत पूर्ववत मोकळे करावेत.
वाघेरी गावात सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने मार्केट यार्ड उभारले जात आहे. त्याठिकाणी गावातील स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.