काचेच्या पुलामुळे नापणे धबधब्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त : पालकमंत्री नितेश राणे

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 22, 2025 19:29 PM
views 62  views

वैभववाडी : नापणे धबधब्यावर बांधण्यात आलेल्या काचेच्या धबधब्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.या पुलामुळे या धबधब्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे असे मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.

सिंधूरत्न योजनेतून मंजूर झालेल्या महाराष्ट्रातील पहील्या काचेच्या पुलाच आज पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील,मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,प्रांतधिकारी जगदीश कातकर,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता विणा पुजारे,उपअभियंता विनायक जोशी,शाखा अभियंता शुभम दुडये,सुधीर नकाशे,प्रमोद रावराणे,भालचंद्र साठे,जयेंद्र रावराणे,नासीर काझी,अरविंद रावराणे,दिगबंर मांजरेकर,प्राची तावडे ,संजय सावंत, हुसेन लांजेकर,सीमा नानीवडेकर आदी उपस्थित होते.

मंत्री राणे पुढे म्हणाले,नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे  सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारुपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा पण स्वतःची काळजी घ्यावी, शासनाच्या नियमांचे पालन करा असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.