आ. नितेश राणे यांनी देवगड रुग्णालयाच्या कामाचे फुकटचे श्रेय घेवू नये

सतीश सावंत यांचा पत्रकार परिषदेत टोला
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 08, 2022 18:52 PM
views 408  views

कणकवली : देवगड उपजिल्हा रुग्णालय ५० खाटांचे रुग्णालय उद्घाटन श्रेय घेण्याचा प्रयत्न आ. नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत, खा.विनायक राऊत यांच्या मुळेच हे रुग्णालय होत आहे. यापूर्वीच महाविकास आघाडीच्या सरकारने नोव्हेंबर २१ मध्ये निविदा या हॉस्पिटलची झाली होती. या कामाबद्दल नितेश राणे यांचा कुठलाही पत्रव्यवहार नाही, विधानसभेत कुठलाही प्रश्न विचारला नाही. आता सत्ता आल्यानंतर दोन तीन महिन्यात काम केल्याचे श्रेय घेणं आणि स्टंटबाजी करणं हे नितेश राणे यांचे काम आहे, असा आरोप जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला.


कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, आनंद ठाकूर, नगरसेवक कन्हैया पारकर, हर्षद गावडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या नेत्याच्या माध्यमातून हे देवगड रुग्णालयाचे काम होत आहे. त्यावेळी विलास साळसकर यांनी ही प्रयत्न केले होते. मुळात आमदारांनी कोणतीही कामे त्यांनी केली नाही. भुईबावडा घाटाच्या काम खा.राऊत यांच्या प्रयत्नामुळे झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने त्याला मंजुरी दिली होती. फक्त ठेकेदार त्यांना स्थानिक आमदार म्हणून भूमिपूजन  करताना भेटतात, तेव्हा ते श्रेय घेतात. जिल्ह्यात ८ धरणांच्या कामांना सरकार बदलले. त्यानंतर स्थगिती देण्यात आली आहे. शिंदे फडणवीस सरकारने या निविदा रद्द करण्यात केल्या आहेत. त्याबाबत शिवसेना सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला आहे.


शिवसेना आ. कैलास पाटील यांनी पीक विमा कंपन्यांविरोधात उपोषण केलं, त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना आले आहेत. नितेश राणे यांचा कोणताही सबंध नाही. याबाबत नितेश राणे यांनी पुरावा सादर करावा. जिल्ह्यात २८ हजार ५०० शेतकऱ्यांना ८० कोटी मिळाल्याचे श्रेय घेत असतील, तर त्यांनी तीन वर्षे पैसे मिळाले नाहीत. त्याबाबत नितेश राणे यांनी विषय समजावून घेतला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेल्या विमाबाबत नितेश राणे यांनी कोणतेही श्रेय घेऊ नये, असा टोला सतीश सावंत यांनी लगावला आहे.

तसेच ३० नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी आंबा, काजू विमा योजना हप्ते भरून विम्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा.शेतकऱ्यांनी पैसे भरावेत,असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.