
देवगड : देवगड कुणकेश्वर येथील सर्व वीज वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देवगड मंडलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र शेट्ये बाळ खडपे, गावचे सरपंच महेश ताम्हणकर, एकनाथ तेली, माजी सरपंच घाडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. लोकांची गैरसोय न करता काम तातडीने पूर्ण करा अशी सूचना आ. नितेश राणे यांनी केली आहे.
सुमारे 12 किलोमीटरची वीज वाहिनी भूमिगत करायची असून याला दोन वर्षाची मुदत आहे. किनारपट्टीवरील सर्व गावांमध्ये भूमिगत वीज वाहिन्या करण्याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. कुणकेश्वर ग्रामपंचायतीने अग्रक्रमाने भूमिगत वीज वाहिन्या करण्याची मागणी केली होती. आमदार नितेश राणे यांनी प्राधान्य क्रमाने प्रयत्न करून या कामाला निधी मिळवून दिला आहे. कुणकेश्वर हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून भूमिगत वीजवाहिन्या झाल्यास अखंड वीज पुरवठा पावसाळ्यातही होऊ शकेल.