'त्या' सिंधुपुत्रांच्या मदतीला धावले नितेश राणे !

कंपनी एच.आरना खडसावलं ; युवकांना दिला धीर !
Edited by: विनायक गांवस
Published on: August 01, 2024 09:29 AM
views 1224  views

सिंधुदुर्ग : गोव्यातील सिप्ला कंपनीकडून तडकाफडकी हिमाचल प्रदेश, सिक्कीम येथे बदली केलेल्या सिंधुपुत्रांच्या मदतीसाठी भाजप नेते, आ. नितेश राणे धावून आले. थेट कंपनी एचआरला फोन लावत राणेंनी खडेबोल सुनावले आहेत. यावेळी वरिष्ठांशी बोलून तातडीनं  तोडगा काढण्याच्या सुचना त्यांनी कंपनी एचआरला केल्यात. तसेच सिंधुदुर्गच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. काळजी करू नका, निश्चिंत रहा असा शब्द उपस्थित सिंधुदुर्गच्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना नितेश राणेंनी दिला. 

सिक्कीम, हिमाचल प्रदेश येथे बदली केलेल्या सिंधुपुत्रांनी आज कणकवली येथे भाजप नेते आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. एस्मा कायद्याचा गैरवापर करून आमची बड्‌डी, सिक्कीम येथे बदली केली आहे. गोवा येथील आस्थापनात गेली अनेक वर्षे आम्ही काम करत आहोत. अनेक कामगारांची कुटुंब सोबत आहेत. मुलांच शिक्षण सुरू आहे. अशावेळी हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम येथील आस्थापनात रुजू होणे शक्य नाही. याची व्यवस्थापनाला कल्पना दिली असता कंपनी व्यवस्थापन सुडबुद्धीने आमच्याशी वागत आहे. रूजू न झाल्यास नोकरी सोडावी लागणार आहे.‌ यामुळे उपासमारीची वेळ आमच्यासह कुटुंबावर येणार असल्याची कैफियत सिप्ला कंपनीच्या अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी आ.‌राणेंसमोर मांडली. 

यावेळी भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी थेट कंपनीच्या एच.आरना फोन लावत याबाबत विचारणा केली. कंपनीत काम करणारी मुलं सिंधुदुर्गची आहेत. किती दिवसात प्रश्न सोडवणार ? असा सवाल त्यांना केला. मी स्वतः त्यांचा पाठपुरावा तुमच्याकडून घेणार, त्यांची घरं व्यवस्थित चाललेली आपल्याला हवी आहेत. या प्रश्नी तातडीनं  तोडगा काढा अशा सुचना राणेंनी केल्या. तर या मुलांची सिक्कीमला बदली कशी करू शकता ? असा सवाल करत नितेश राणेंनी खडेबोल देखील सुनावले. यावेळी वरिष्ठांशी बोलून लागलीच तोडगा काढण्याचा शब्द कंपनी एचआरनी आ. राणेंना दिला.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही. तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यामुळे काळजी करू नका, निश्चिंत रहा असा शब्द नितेश राणेंनी अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना दिला. यावेळी सिंधुपुत्र कर्मचारी म्हणाले, आमचं काम नितेश राणे करतील हा विश्वास असल्यानं त्यांची भेट घेतली. आमच्या पाठीशी ते उभे राहिले त्यासाठी आम्ही आभारी आहोत अशा भावना सिप्ला कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी राजेंद्र सरनोबत, दत्तप्रसाद राऊळ,प्रथमेश कुडतरकर,सिद्देश गावडे,विठ्ठल नाईक, विशाल नाईक, शिवराज उदगावे,चंदन प्रधान,साक्षी पालव आदी सिंधुपुत्र कर्मचारी उपस्थित होते.