
सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने शनिवारी चंदगड येथे नऊवारी साडी शिवण प्रशिक्षण वर्गाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देऊन त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रशिक्षणामुळे महिलांना घरबसल्या उत्पन्न मिळवण्यासोबतच व्यावसायिक आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी समाजसेविका भारती जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी रत्नमाला वाडेकर, प्राथमिक शिक्षिका स्नेहल कुरणे, डॉ. सौ. देसाई, सौंदर्य व्यवसायिक साळुंखे मॅडम आणि संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मनस्विनी कांबळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
यावेळी भारती जाधव म्हणाल्या, “स्वावलंबनासाठी अशा प्रशिक्षणाचा महिलांनी नक्कीच लाभ घ्यावा. छोट्या उद्योगातून आर्थिक स्वातंत्र्यासह सामाजिक आत्मभान मिळते.” रत्नमाला वाडेकर यांनी कृषीपूरक व्यवसायात महिलांनी पुढाकार घ्यावा असे सांगितले. डॉ. देसाई यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे स्वागत व आभारप्रदर्शन मनस्विनी कांबळे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या इतर उपक्रमांची माहितीही उपस्थितांना दिली.
या प्रशिक्षणातून चंदगडमधील महिलांना पारंपरिक कौशल्याचा आधुनिक बाजारपेठेत उपयोग करून घरगुती उद्योग, बुटीक उभारणी तसेच ऑनलाईन साडी विक्रीसारख्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.










