निलेश राणेंचे खा. राऊतांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप

Edited by: भरत केसरकर
Published on: April 14, 2024 12:54 PM
views 336  views

सिंधुदुर्ग : लांजा तालुक्यात केंद्र सरकारच्या मदतीवर ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या जलजीवन योजनेतील कामात ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मदतीने विद्यमान खासदार विनायक राऊत यांनी सव्वातीन कोटी रुपयांची रक्कम त्या ठेकेदाराकडून स्वीकारून फार मोठा भ्रष्टाचार केला आहे. कामे न करताच पैसा हडप करण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे अशी माहिती देत जनतेच्या पिण्याच्या पाण्याचे पैसे चोरणारा खासदार म्हणून विनायक राऊत यांची  नवी ओळख जनतेसमोर आणत असल्याचे कुडाळ विधानसभा प्रमुख  भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते ओरोस येथे भाजप कार्यलयात पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल,कुडाळ तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर,जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर,सौ.संध्या तेर्से,पप्या तवटे,रूपेश कानडे यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून  या तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्यासाठी 64 कोटी 41 लाख 67 हजार एवढ्या मोठ्या रकमेची जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर झाली. या तालुक्यातील 109 महसुली गावात ही कामे होणार होती. यामधून  33 कोटी 92 लाख 30 हजार रुपयांची कामे ही  उभाठा सेनेचा  जिल्हा समन्वयक व शिव साई  असोसिएट चा मुख्य प्रमोटर रवींद्र डोळस यांनी घेतली. जवळपास एका गावातीलच  फक्त 13 लाख रुपये किमतीची कामे पूर्ण असताना त्या ठेकेदार कंपनीला   16 कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली.  व यातील सव्वातीन कोटी रुपये  हवाला रक्कम  खासदार विनायक राऊत यांना त्या ठेकेदाराने दिल्याची गंभीर घटना आकडेवारी व भ्रष्टाचार झाल्याच्या पुराव्यासह आपण तपासी नियंत्रणाकडे देत असल्याचे निलेश राणे यांनी जाहीर केले. 

विनायक राऊत यांनी या कामात ठेकेदार संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप  नितेश राणे यांनी केला आहे. या कामातील रक्कम त्यांनी स्वीकारल्याचा उल्लेख व तसा पुरावा  आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण प्रथम  पोलीस ठाण्यामध्ये एफ आर आय दाखल करणार आहोत. असेही निलेश आणि यांनी स्पष्ट केले.