निलेश राणेंचा दणका

बाजारपेठेतील रखडलेले 'ते' काम तात्काळ सुरू
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 24, 2022 13:14 PM
views 653  views

 मालवण : मालवण बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराच्या बांधकामासाठी मालवण नगरपरिषदेकडून २८ लक्ष एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही काम सुरू झाले नव्हते. चर्मकार वसाहतीची मागणी आणि त्यांची समस्या पहाता हे काम तातडीने पूर्ण व्हावे. याबाबत मालवण येथील भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी नगरपालिका प्रशासन व ठेकेदार यांच्या दिरंगाई कारभाराबाबत भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. याप्रश्नी निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व मालवण नगरपरिषद प्रशासक यांना लेखी पत्राद्वारे तात्काळ काम सुरू करण्याबाबत सूचित केले.


कामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार हा वेळकाढूपणाच्या धोरणाचा अवलंब करत आहे. निधीची उपलब्धता असूनही केवळ ठेकेदारामुळेच या कामाला विलंब होत आहे. याचा त्रास चर्मकार वसाहतीला सहन करावा लागत आहे. तरी सदरील विषयाचा आपण गांभीर्याने विचार करून मालवण दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराचे बांधकाम त्वरित सुरू करण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत आणि हे काम योग्य तो दर्जा राखून वेळेत पूर्ण व्हावे याची दक्षता घ्यावी. अशा आशयाचे पत्र भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिले होते. 

त्यानुसार नगरपरिषद प्रशासन ठेकेदार यांच्या माध्यमातून गुरुवार सकाळ पासून कामाला सुरुवात झाली आहे.