
कुडाळ : "उद्धव ठाकरे गटाकडे सध्या सक्षम उमेदवारांची मोठी कमतरता भासत आहे. अनेक ठिकाणी लोकांना जबरदस्तीने उमेदवारी देण्यात आली असून, आता ते उमेदवार आपले अर्ज मागे घेत आहेत. याउलट, महायुतीच्या विकासकामांवर विश्वास ठेवून विरोधकांचे कार्यकर्ते आमच्याकडे वळत आहेत. त्यामुळे कोकणातील अनेक जागा बिनविरोध निवडून येतील," असा ठाम विश्वास आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे व्यक्त केला.
कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी निवडणूक, जिल्हा परिषदेचा कारभार आणि महायुतीची रणनीती यावर भाष्य केले.
जिल्हा परिषदेचा कायापालट करणार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कारभारावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, "गेल्या २७ वर्षांपासून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त राहिला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी ही संस्था मुख्य कणा आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेचा 'टर्नओव्हर' किमान २५ टक्क्यांनी वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट असून, जास्तीत जास्त निधी आणून नवनवीन योजना राबवण्यावर आमचा भर असेल."
महायुतीत 'ऑल इज वेल'
नुकतीच पालकमंत्री नितेश राणे आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, महायुतीमध्ये कोणतीही कुरबूर नाही. सर्व नेते आणि कार्यकर्ते एका कुटुंबाप्रमाणे एकत्र काम करत असून, सर्व जागा जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत
डोंबिवलीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राणे म्हणाले की, "राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून घेतलेले हे निर्णय योग्यच असतील."










