कार्यकर्त्यांच्या भितीने तीन तीन नाईक विरोधात : निलेश राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 30, 2024 13:50 PM
views 79  views

मालवण : माझ्या कार्यकर्त्यांच्या भितीने तीन तीन नाईक माझ्या विरोधात उतरले आहेत. कशाच्या भितीने या खेळी केल्या जात आहेत? असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित करत कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर मी धनुष्यबाण हाती घेतला आहे. खासदार नारायण राणे यांच्या राजकीय कारकिर्दीचीही सुरूवात धुनष्यबाणानेच झाली होती, यामुळे आज त्यांच्याच निशाणीवर मला निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दहा वर्षात हा मतदार संघ अनेक वर्षे मागे गेला आहे. हा मतदार संघ पाच वर्षात राज्यातील पहिल्या पाच मतदार संघांमध्ये नेऊन पोहचविण्याचे काम मी करणार आहे असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथील शिवसेना मेळाव्यात केले. 

कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे आज शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा झाला. 

राजा गावकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी आजपर्यंत तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला दुचाकीवरून कार्यकर्ते येत होते, मात्र आज तीन वर्षांनंतर मालवण तालुका कार्यकर्त्यांच्या सभेला गाड्यांच्या गाड्या भरून कार्यकर्ते आल्याचे पाहून समाधान वाटले. निलेश राणे आणि दत्ता सामंत हे संघटनेत आल्याने नविन उभारी मिळणार आहे. 

यावेळी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, मतदार संघ समन्वयक महेश कांदळगावकर, प्रितम गावडे, मधुकर चव्हाण, विश्वास गावकर, किसन मांजरेकर, सुरेश चौकेकर, दिलीप बिरमोळे, रविना घाडीगावकर, सुधीर साळसकर, स्नेहल बिरमोळे, संतोष कोदे, सुनील घाडीगावकर, संतोष साटविलकर, सुशांत घाडीगावकर, मंदार लुडबे, रत्नाकर जोशी, निलम शिंदे, बाळु नाटेकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपतालुका प्रमुख पराग खोत, शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हा प्रमुख नीलम शिंदे, महिला तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, हर्षद पारकर, चंद्रकांत गोलतकर, अल्पेश निकम, युबसेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हा संघटक सोनाली पाटकर, पूनम वाटेगावकर, रूपेश पावसकर, जेरॉन फर्नांडिस, महेश बागवे, छोटू ठाकूर, राजू सावंत, दादा परब, बाळा माने, उमेश बिरमोळे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना नेते म्हणून निवड झालेल्या संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख राजा गावडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी गेल्या काही महिन्यात कोट्यवधी रूपयांचा निधी जिल्हयासाठी उपलब्ध करून दिल्याने काही प्रमाणात कामे झाली आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनीही या मतदार संघासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र आमदार वैभव नाईक यांची प्रशासनावर पकड नसल्याने निधी असतानाही कामे अपूर्ण राहिली आहेत, असा टोला श्री. राणे यांनी यावेळी लगावला. 

आमदार वैभव नाईक यांचा पराभव निश्चीत असल्याने आता अफवांचे पेव फुटतील मात्र आम्हाला त्याची कल्पना आहे. जनतेची कामे केली असती तर अफवा पसरविण्याची आवश्यकता भासली नसती. दत्ता सामंत हे राणे कुटुंबियांच्या घरातील व्यक्ती आहे. त्यांनी कठीण काळातही राणे कुटुंबियांसोबत राहणे पसंत केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न केला, मात्र नियतीलाच त्यांचे मुख्यमंत्री होणे पसंत नसल्याने त्यांची खुर्ची गेली, त्यांच्या कारकिर्दीत आम्हाला झालेल्या वेदना आम्ही विसरू शकत नाही. आम्हाला अडचणीत आणण्यासाठी त्यांनी सर्वप्रकारचे प्रयत्न केले होते, यामुळे आता निवडणुकीतही खोट्या अफवा पसरविण्यात येतील. यामुळे कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून घराघरात पोहचून घनुष्यबाण निशाणीवर मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. राणे यांनी केले.