
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, निलेश राणे यांचा विजय ही काळ्या दगवरची रेघ आहे. लोकसभेला 27 हजाराचे लीड मिळाले त्याच्या दुप्पट आता मिळायला हवे. त्यासाठी राहिलेले चार दिवस डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे. राज्य सरकारने अनेक योजना आणल्या. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी राहणार आहे.
निलेश राणे भावनिक आहेत. त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार होता त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी पक्षप्रवेश केला. नारायण राणे यांनी ज्यांना ज्यांना दिलं ते सर्व गेले. आज सिंधुदुर्ग वासिय पेटून उठले आहेत. ते राणे कुटुंबाच्या पाठीशी राहतील. जिल्ह्यात तीनही मतदार संघात महायुतीचे आमदार असतील. विरोधक फक्त राणे आणि सामंत कुटुंबावर बोलतात. आम्ही त्यांचं काय घोडं मारलं माहिती नाही असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. राणे कुटुंब चिडले पाहिजे यासाठी उबाठाची लोकं रणनीती आखत आहेत. कोणी काहीही केलं तरी निलेश राणे निवडून येतील. मात्र, मताधिक्य वाढले पाहिजे.
ज्यांचे आमदार निवडून येणारच नाहीत ते मोठमोठी आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक सांगत होते. विमानतळ नारायण राणे यांनी आणले. त्यावेळी हेच विरोधात होते. नारायण राणे यांच्यासारखं नेतृत्व जपलं पाहीजे. कोणीही उठतो आणि कोणावरही बोलतो. जिल्ह्याच्या विकासासाठी राणेच हवे आहेत. त्यामुळे निलेश राणे 50 हजार अधिक मताधिक्याने निवडून यावेत यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन सामंत यांनी केले.