सिंधुदुर्गात 'शाश्वत रोजगार ' उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील : निलेश राणे

विशाल परब यांचंही कौतुक !
Edited by: भरत केसरकर
Published on: January 12, 2024 08:02 AM
views 300  views

सावंतवाडी : ब्रिटिशांनी पुढील कित्येक वर्षांचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने मुंबई शहर वसवलं होतं. त्याचा फायदा आज आपण घेत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच आम्ही सर्वजण पुढील भविष्यकाळाचा विचार करून या जिल्ह्यात 'शाश्वत रोजगार ' उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरून येथे अशा पद्धतीने रोजगार उपलब्ध व्हावा की त्यासाठी अशा प्रकारे रोजगार मेळावे घेण्याची वेळ येऊ नये या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. विशाल परब, युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात आलेला हा रोजगार मेळावा अतिशय सुत्य उपक्रम आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा कुडाळ विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी सिंधुरत्न रोजगार मेळाव्याच्या योजना बद्दल विशाल परब त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

       सावंतवाडी जिमखाना मैदान येथे भाजपायुवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, भाजपा सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच भाजपा युवा मोर्चा यांच्या माध्यमातून आयोजित 'सिंधुरत्न जॉब फेअर' या भव्य रोजगार मेळाव्याला माजी खासदार निलेश राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्याहस्ते मेळाव्यात निवड झालेल्या काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे व जॉब कार्ड वितरित करण्यात आली.

     यावेळी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रयास भोसले, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रभाकर परब, युवा हब चे दीपक पवार, किरण रहाणे, जावेद खतीब, माजी नगरसेवक गुरु मठकर, केतन आजगांवकर, तेजस माने, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

      सिंधुदुर्ग जिल्हा सह कोकण प्रदेश हा शेतीप्रधान आहे. मात्र, येथील तरुणांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आम्ही देखील भाजपच्या माध्यमातून या भागात प्रदूषण न होणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून शाश्वत रोजगार कशाप्रकारे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्नशील आहोत. 

        केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून सी वर्ल्ड सरकार महत्वकांक्षी प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले. आडाळी एमआयडीसी, रेडी पोर्ट, चिपी विमानतळ यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून या भागाचा शाश्वत विकास होऊन येथे विविध कंपन्यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्याच पार्श्वभूमीवर भविष्यातही अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करणार आहोत,  अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.


विशाल परब व सहकाऱ्यांनी केलेले आयोजन स्तुत्य : निलेश राणे


      विशाल परब व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून केलेले आयोजन अत्यंत स्तुत्य आहे. आपल्या जिल्ह्यात 'रोंबाट स्पर्धा ' घेताना अनेकांना पाहिले होते मात्र भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष येथील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी असे रोजगार मिळावे घेत असतो. यापूर्वी कुडाळ मध्येही रोजगार मिळावा घेण्यात आला होता. त्यातूनही अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करण्यात आले होते. या मेळाव्यातूनही सुमारे दीडशे कंपन्यांच्या माध्यमातून वीस हजारहून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.