आमदार निलेश राणेंनी फेडला नवस

सिंधुदुर्ग राजाला अर्पण केलं सोन्याचं पाऊल
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 28, 2025 11:51 AM
views 436  views

कुडाळ : कुडाळ - मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी निवडणुकीत निवडून आल्याने आपला नवस फेडण्यासाठी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी सोन्याचे पाऊल अर्पण केले. गेल्या वर्षी कार्यकर्त्यांनी केलेल्या नवसामुळे निलेश राणे आमदार झाले आणि त्यामुळे यंदा गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी हा नवस पूर्ण करण्यात आला.

गेली १६ वर्ष राणे कुटुंबीयांच्या माध्यमातून कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी गणेशोत्सवाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण यावर्षी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे अशा तिन्ही पदांवर राणे कुटुंबीयांचे सदस्य विराजमान झाले आहेत.

गेल्या वर्षी गणेशोत्सवात कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग राजाला नवस केला होता की, निलेश राणे आमदार झाल्यास सोन्याचे पाऊल अर्पण केले जाईल. कार्यकर्त्यांच्या या नवसाला गणरायाने प्रतिसाद दिला आणि निलेश राणे आमदार झाले. त्यामुळे यंदा गणेशोत्तोवाच्या पहिल्याच दिवशी, सिंधुदुर्ग राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी हा नवस फेडण्यात आला.

डॉ. जी. टी. राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि राकेश नेमळेकर यांनी गणरायाला सोन्याचे पाऊल परिधान केले. हे सोन्याचे पाऊल शहरातील सुवर्णकार राजू पाटणकर यांनी बनवले होते. यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यात उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, प्रितेश राऊळ, विनायक राणे, आणि इतर मान्यवरांचा समावेश होता.