
मालवण : अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. मालवण कुडाळ मधील वीज समस्या प्राधान्यक्रमाने सोडवल्या जाणार आहेत. वरिष्ठ वीज अधिकारी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून कार्यवाही सुरु झाली आहे. जादा सबस्टेशनं उभारणी, वीज ट्रान्सफार्मर, जीर्ण वीज साहित्याची दुरुस्ती आणि नवीन पायाभूत सोई सुविधा साहित्य जोडणी हे प्रमुख चार टप्पे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या कामाची सुरवात आमदार निलेश राणे यांच्या मतदारसंघातून करा. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश आमदार निलेश राणे यांचे कार्य कर्तृत्व अधोरेखित करतं आहेत.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी वीज अधिकाऱ्यांकडून मालवण तालुक्याचा आढावा घेतला. तसेच आवश्यक सूचना केल्या आहेत. महाराष्ट्र विधिमंडळच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोकणातील विजेच्या गंभीर समस्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण आकडेवारीसह अभ्यासपूर्ण मांडणी करताना सभागृहात वीज प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाची गांभीर्याने दखल ऊर्जा विभागाने घेतली. राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी कोकण विभागातील ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वीज समस्या बाबत विविध तांत्रिक अडचणी, खंडित वीजपुरवठा, वितरण व्यवस्था आणि नागरिकांच्या तक्रारी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. योग्य त्या उपाययोजना राबवण्यासाठी स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
मालवण कुडाळ मतदारसंघात जादा सबस्टेशनं उभारणी, वीज ट्रान्सफार्मर, जीर्ण वीज साहित्याची दुरुस्ती आणि नवीन पायाभूत सोई सुविधा साहित्य जोडणी हे प्रमुख चार टप्पे असणार आहेत.
दरम्यान, मालवण वीज अभियंता सचिन मेहत्रे यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन माहिती दिली. पहिल्या टप्प्यात वीज सुविधा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने दुरुस्तीसाठी 8 कोटी प्रस्तावित निधी ची मागणी करण्यात आली आहे. तर तालुक्यातील आवश्यक त्या ठिकाणी ट्रान्सफार्मर उभारणी होणार आहे. सब स्टेशन संख्या वाढवली जाणार आहे. दुरुस्ती तसेच नव्या वीज सुविधा उभारल्या जातील. भूमिगत वीज वाहिन्या जोडणी सुरु आहे. त्याठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, वाहतूक सुरळीत राहील या दृष्टीने काम करा. अश्या सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. तारकर्ली-देवबाग मार्गांवर समस्या आहेत त्या सोडवा असेही आमदार निलेश राणे यांनी सूचित केले.
निधी कमी पडू देणार नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या वीज समस्या सुटल्याच पाहिजेत. कुठे ट्रान्सफार्मर, कुठे सबस्टेशनं हवे या सर्वांचा सर्व्हे करून प्रस्ताव द्या. मंजुरी आणि निधीची तरतूद करून आणण्याची जबाबदारी माझी. असे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
आढावा बैठक दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हासरचिटणीस दादा साईल, तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दिपक पाटकर उपस्थित होते.