सिंधुदुर्गनगरी : मी महायुती मानणारा आहे. महायुतीचे आम्ही घटक आहोत. परंतु माझी संघटना मला एक नंबर करायची आहे. आजचा कार्यकर्ता मेळावा ताकद दाखविण्यासाठी, अस्तित्व दाखविण्यासाठी किंवा शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाही. तर आपण असतो तेथे प्रामाणिक असतो, हे दाखविण्यासाठी आहे, असे प्रतिपादन आ निलेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित ओरोस मंडळ शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
कुडाळ तालुक्यातील ओरोस मंडळाचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा मंगळवारी सिंधुदुर्गनगरी येथील श्री इच्छापूर्ती कार्यालयात आ निलेश राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा संघटक संजू परब, महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, दादा साईल, किसन मांजरेकर, रुपेश पावसकर, उपजिल्हा प्रमुख राजा गावडे, आनंद शिरवलकर, बबन शिंदे, कुडाळ माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, विनायक राणे, योगेश तुळसकर, अरविंद करलकर, राजा गांवकर, हरेश पाटील, दीपक नारकर, किशोर मर्गज, विकास साळसकर, जिल्हा प्रवक्ते श्री जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ राणे यांनी काही तरी मिळवायचे आहे आपली ताकद दाखविण्यासाठी हा मेळावा घेतलेला नाही. तर आम्ही ज्या पक्षात असतो तिथं १०० टक्के असतो हे दाखविण्यासाठी आहे. आपल्याला पाडण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. कोणी केले ते आपल्याला माहिती आहे. दोन महिन्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शिवसेना ही जिवाभावाची आणि बाळासाहेबांची संघटना आहे. प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मला शांतपणे पक्ष वाढीचे काम करू द्या. पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेली संघटना सिंधुदुर्गात तयार करणार आहे. पक्ष वाढीसाठी जिल्हा प्रमुख सामंत, उपनेते आंग्रे अहोरात्र मेहनत घेत आहेत. आता कार्यकर्त्यांनीही मैदानात उतरावे असे आवाहन करतानाच आ राणे यांनी सगळेच पैशाने होत नाही. त्याचा विचार करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले.
यावेळी बोलताना उपनेते संजय आंग्रे यांनी, निलेश राणे यांचा स्वभाव वेगळाच आहे. त्यांचा स्वभाव ज्याने ओळखला तो त्यांना सोडून कधीच जाणार नाही. कायम त्यांच्याशी एकनिष्ठ राहणार, असे व्यक्तिमत्त्व त्यांचे आहे, असे सांगतानाच तुम्ही आदेश द्या तुमच्या मनाप्रमाणे काम करू, असे आ राणे यांना आश्र्वस्त केले. महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर यांनीही यावेळी आपले विचार मांडताना पक्ष संघटनेत महिलांना मानाचे स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मेरिट पाहून पदे देणार : दत्ता सामंत
एकाही व्यक्तीने भाजप मधून शिवसेनेत येताना आपल्याला कोणती पदे मिळणार ? असा प्रश्न केलेला नाही. आम्ही ओरोस मंडळ मधील ६३ बूथ केंद्रात फिरलो. एकाही व्यक्तीवर आम्ही जबरदस्ती केली नाही. केवळ राणे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचा आज पक्षप्रवेश होत आहे. आमची कुठल्या पक्षाशी स्पर्धा नाही. परंतु स्थानिक आमदार शिवसेनेचे असल्याने तो पक्ष त्या मतदार संघात मजबूत असला पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे. पक्षात आल्यावर मी जुना आहे, नवीन आहे, असे ऐकले जाणार नाही. मेरिट पाहून पदे दिली जाणार आहेत. ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची फौज आहे. त्यांना पदे दिली जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला गाव म्हणजे घर समजून काम करावे. गावात स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी बोलताना केले.