
कुडाळ : संघटनेचे काम करताना विरोधकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मी तीनदा लोकसभा लढवली. दोन वेळा मत कमी पडली. तशी वेळ यावेळी येऊ देऊ नका, असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी केले. मागच्या दहा वर्षात विद्यमान खासदारांनी काहीही केले नाही याची चर्चा लोकांमध्ये झाली पाहिजे. एक तरी विषय या विद्यमान खासदारांनी पूर्ण केला का? एक तरी प्रश्न सोडवला का, असा प्रश्न निलेश राणे यांनी विचारला. हे खासदार काही करू शकले नाहीत. मतदारसंघात काय चालले याची दिल्लीत माहितीही नाही, अशी टीका निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर केली. लोकसभेत दमदार माणूस पाठवायचा आहे. लोकसभेत बाजापेटी वाजवून चालत नाही. असा मिश्किल टोलासुद्धा निलेश राणे यांनी विनायक राऊत यांना लगावला.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, ५१ टक्के मतदान आपल्याला मिळवायचे आहे. त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केलेली आहे. आपल्या उद्दिष्टानुसार आपण नियोजन केले पाहिजे. तुमच्या जबाबदाऱ्यांच्या अनुसार तुम्हाला आता पावले टाकण्याची वेळ आलेली आहे. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी यावेळी केले. निवडणूकीत कोणतेही गालबोट लागता नये. वाद वाढतील कसे, यावर विरोधकांची रणनीती ठरलेली आहे. तिकडे लक्ष देऊ नका. आपल्या बुथचे मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करा. महायुतीच्या उमेदवाराला पहिल्या पाचातले मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार करूया असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी यावेळीं केले.
वातावरण कसे दूषित होईल हेच विरिधक बघत आहेत। तुम्ही फक्त तुमचा बूथ सांभाळा, असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले. ९१८ बूथ आणि त्यावर प्रत्येकी ३ हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास तेली यानी व्यक्त केला.
बैठकीचे प्रास्ताविक अतुल काळसेकर यांनी केले. भाजपची निवडणूक यंत्रणा वर्षभर कार्यकर्त असते. भाजप निवडणूक जिंकते ते बुथवरील कार्यकर्त्यांमुळे. भाजपची ताकद बूथ यंत्रणा आहे. ती अन्य कोणत्याही पक्षकडे नाही असे अतुल काळसेकर म्हणाले.
या संघटनात्मक बैठकिला जिल्हाभरातून भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन रणजित देसाई यांनी तर आभार प्रदर्शन प्रभाकर सावंत यांनी केले. राह्ष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली.