निलेश मेस्त्री यांचा शिवसेनेत प्रवेश...!

Edited by: विनायक गावस
Published on: September 07, 2023 15:04 PM
views 122  views

सावंतवाडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश मेस्त्री यांनी काल सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी  निलेश मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेचा भगवा हाती घेतला. निलेश मेस्त्री यांच्या सोबत भरत भालेकर, सिद्धेश मोंडकर, विजय धोपटे, दर्वेश परब, तुकाराम कारेकर या मनसैनिकांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद कणकवली विधानसभा मतदारसंघात आणखी वाढली असून सिंधुदुर्गात मनसे संघटनेला हा धक्का समजला जात आहे आहे. निलेश मेस्त्री हे मुंबईत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेने शी जोडले गेले. मनसेनेने त्यांच्याकडे विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती त्यानंतर त्यांनी जिल्ह्यात विद्यार्थी संघटनेचे जाळे निर्माण केले होते.निलेश मेस्त्री हे कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील असून त्या भागात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या संपर्कात ते होते. आग्रे यांनी अनेक सामाजिक उपक्रमात निलेश मेस्त्री यांना साथ दिली होती. सध्या शिवसेनेत इतर पक्षातील अनेक पदाधिकारी प्रवेश करत आहेत. गेल्या आठवड्यातच देवगडच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.  आता निलेश मेस्त्री यांच्या रूपाने आणखी एक पदाधिकारी शिवसेनेला मिळालेला आहे. संजय आग्रे यांनी जिल्ह्यात संघटना वाढीसाठी कंबर कसली असून इतर पक्षातील अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत.शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळे आपल्याला सामाजिक कार्य करण्यासाठी आणखी बळ मिळाले आहे. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या नेतृत्वाखाली आपण संघटना वाढीचे काम करणार असून माझ्या कोंडये गावातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचेही निलेश मेस्त्री यांनी  यावेळी सांगितले.