निगुडे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Edited by:
Published on: July 28, 2024 12:23 PM
views 207  views

बांदा : जिल्हा परिषद शाळा निगुडे नं. 1 शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी व माजी प्रशासकीय अधिकारी गजानन नरसुले यांच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य व  खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी स्वतः गजानन नरसुले , निगुडे गावचे सरपंच  लक्ष्मण निगुडकर तसेच निगुडे गावचे माजी उपसरपंच  गुरुदास गवंडे आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका रंजना सावंत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक नारायण नाईक सर यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना गुरुदास  गवंडे यांनी तुम्ही शिकून गावाचे नाव मोठे करा अडचण असेल तेव्हा मदतीला येऊ फक्त आवाज द्या असे सांगितले तर निवृत्त अधिकारी गजानन नरसुले  यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्या हे मौलिक व अक्षय धन आहे. ते मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न केला पाहिजे. तुमच्यातून आदर्श नागरिक व अधिकारी तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शाळेच्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर यांनी मुलांना नैतिक मूल्ये शाळेत अंगिकारून मोठे व्हा मात्र मागे वळून जरूर पाहा व नरसुले काकांचा आदर्श घेऊन मदतीचा हात पुढे करा असे सांगितले.

तसेच निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी देखील तुम्हाला गुरगुरायचे असेल तर शिक्षण रुपी वाघिणीचे दूध प्राशन करा असे सांगितले. सर्व उपस्थितांनी नरसुले काकांना उत्तम आयु आरोग्य लाभो व त्यांच्या हातून असेच सामाजिक काम होत राहो अशा सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक  पांडुरंग होंडे सर यांनी केले व शेवटी शिक्षिका रुपाली नेवगी  यांनी आभार मानले.

तसेच माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी मुलांना शाळेत बसण्यासाठी केली बैठकांची  कापडी पट्टी उपलब्ध करून दिल्याबद्दल  त्यांचे शाळा निगुडे नं 1 च्या मुख्याध्यापिका व शाळा प्रशासनाच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी निगुडे शाळेच्या मुख्याध्यापिका गौरवी पेडणेकर, शिक्षक नारायण नाईक, पांडुरंग होंडे, रुपाली नेवगी, सरपंच लक्ष्मण निगुडकर, निवृत्त अधिकारी गजानन नरसुले, गुरुदास गवंडे, अंगणवाडी सेविका रंजना सावंत, विद्यार्थी उपस्थित होते.