
रत्नागिरी : आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला अत्याधुनिक वाहने मिळाली आहेत. डोंगराळ भाग, खडकाळ आणि अरूंद मार्गावरील आगीवर नियंत्रण मिळवणे यामुळे सोपे होणार आहे. वेगळा गिअर, कटर, फोम, लाईट आणि पाण्याची व्यवस्था असणारी ही फायर अॅण्ड रेस्क्यू व्हॅन आहे. रत्नागिरी जिल्हा हा दऱ्याखोऱ्यातील डोंगराळ आणि खडकाळ आहे. उन्हाळ्यात गवताला आणि फळबागांना आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये शॉर्टसर्किटचेही प्रमाण अधिक आहे. अशा डोंगराळ भागात आग लागल्यानंतर अग्रिशमन वाहन त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अशावेळी रत्नागिरी आणि चिपळूण पालिकेला मिळालेली नवीन गाडी उपयोगी पडणार आहे. डोंगरातून जाणाऱ्या खडकाळ वाटेवरूनही जाऊ शकतील, अशी त्या वाहनांच्या चाकांची रचना आहे आणि स्पेशल गिअर आहे. त्यामुळे आता आणखी एका नवीन फायर अँड रेस्क्यू अग्निशमनची भर पडली आहे.
जिल्ह्यात कुठेही आग लागण्याची दुर्घटना घडल्यावर रत्नागिरी पालिकेच्या अग्निशमन दलाला जावे लागते. अरूंद रस्त्यांच्या ठिकाणी किंवा खडकाळ, डोंगराळ भागात जाताना मोठ्या अग्निशमन बंबावर मर्यादा येत होत्या. नवीन फायर अॅण्ड रेस्क्यू अग्निशमन गाडी मिळाल्याने ही अडचण आता संपुष्टात आली आहे. ही गाड कशी वापरायची, याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. रत्नागिरी पालिकेकडे आता दोन मोठे अग्निशमन, दोन बुलेट दुचाकीचे अग्निशमन आहेत. चिपळूण शहरामध्ये दरवर्षी पुराचे पाणी भरते. वारंवार नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे या व्हॅनचा पालिकेला त्या अनुषंगाने चांगला उपयोग होणार आहे.