LIVE UPDATES

सावंतवाडीतील सरपंचपदांच्या आरक्षणाची पुन्हा सोडत

तारीख जाहीर
Edited by: विनायक गावंस
Published on: July 08, 2025 17:33 PM
views 47  views

सावंतवाडी  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नवीन आरक्षण सोडत आता १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृह येथे काढण्यात येणार आहे.     

तरी तालुक्यातील सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी या सोडत कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे. 

 यापूर्वी, मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील सुधारीत तरतुदींनुसार, ५ मार्च २०२५ रोजीच्या राजपत्रानुसार आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या २८ मार्च च्या पत्रानुसार, ८ एप्रिल रोजी सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. याबाबतची अधिसूचना २९ एप्रिल  रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ग्रामविकास विभागाने १३ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेमुळे मागील सर्व अधिसूचना रद्दबातल ठरवण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका क्रमांक १९७५६/२०२१ प्रकरणी ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच आणि उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २-अ मधील उपनियम (१) आणि (२) नुसार ही नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही अधिसूचना राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.  या बदललेल्या परिस्थितीमुळे, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या १३ जून रोजीच्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या ७ जुलै २०२५ रोजीच्या पत्रानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची प्रवर्गनिहाय आरक्षित पदे सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन निश्चित करण्यात येणार आहेत.

सावंतवाडी तालुक्यासाठी ग्रामपंचायतींची एकूण संख्या ६३ असून, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,११,९२४ आहे. नव्या निर्देशानुसार, संभाव्य आरक्षित पदांचा तपशील खालीलप्रमाणे असेल अनु. जाती करिता आरक्षित सरपंचाची पदे: ४,  अनु. जमाती करिता आरक्षित सरपंचाची पदे: ०, ना.मा. प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे: १७, खुला प्रवर्ग: ४२,अनु. जाती प्रवर्गातील महिला: २,अनु. जमाती प्रवर्गातील महिला: ०,ना. मा. प्रवर्गातील महिला: ८,खुल्या प्रवर्गातील महिला: २१ यानुसार, १५ जुलै रोजी होणारी आरक्षण सोडत ही आगामी पाच वर्षांसाठी सरपंचपदांची स्थिती निश्चित करणार असल्याने ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.