कुडाळ शहराच्या विकासाला नवी दिशा

दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा उद्या 'शुभ-आरंभ' !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 28, 2025 17:05 PM
views 297  views

कुडाळ : 'स्वच्छतेतून सौंदर्याकडे' हे ब्रीदवाक्य घेऊन कुडाळ शहराच्या विकासाला कलाटणी देणाऱ्या दोन बहुचर्चित प्रकल्पांचा, म्हणजेच गणेशघाट सुशोभिकरण आणि MIDC घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारणी कामी संरक्षक भिंत बांधकामाचा, शुभारंभ सोहळा बुधवार, दिनांक २९/१०/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून रेंगाळलेले हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यामुळे व प्रयत्नातून मार्गी लागत आहेत.

गणेश घाट: आस्थेचे व सौंदर्याचे केंद्र

शहरातील मुख्य गणेश घाट हा प्रत्येक कुडाळवासियांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. आता या घाटाचे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे आधुनिक सुशोभिकरण होणार असून, हा प्रकल्प कुडाळवासियांसाठी परंपरेचा व सौंदर्याचा मिलाफ ठरणार आहे.

 स्वच्छ कुडाळसाठी घनकचरा प्रकल्प मार्गी

कोणतेही शहर किती प्रगत आहे, हे त्याच्या स्वच्छतेतून दिसून येते. कुडाळ नगरपंचायत स्थापनेपासून म्हणजे सुमारे १० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीपासून घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारणीसाठी जागेच्या खरेदीसाठी पाठपुरावा करत होती. आमदार महोदयांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मागील १० वर्ष रखडलेला कुडाळ MIDC कडील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा मंजूर भूखंडाचा ताबा नगरपंचायतीकडे देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे 'स्वच्छ कुडाळ व सुंदर कुडाळ' ही संकल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे.

उद्या होणार शुभारंभ

गणेशघाट सुशोभिकरण व घनकचरा व्यवस्थापन केंद्र उभारणी कामी संरक्षक भिंत बांधकाम या दोन्ही कामांचा शुभारंभ सोहळा बुधवार, दिनांक २९/१०/२०२५ रोजी अनुक्रमे भंगसाळ - मुख्य गणेशघाट व कुडाळ MIDC येथे नियोजित आहे.

नगराध्यक्षा प्राजक्ता अशोक बांदेकर शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील सर्व नागरिकांना, अधिकारी-पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहून शहराच्या विकासाच्या या 'नवी दिशा: नवा आरंभ' मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.